ठाण्यात ३८ ठिकाणी ‘तळी’, घोडबंदर मार्गावर वाहतूक मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:33 AM2018-07-11T01:33:55+5:302018-07-11T01:34:23+5:30
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीदेखील दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सुमारे ३८ भागात पाणी साचले होते.
ठाणे - शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीदेखील दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सुमारे ३८ भागात पाणी साचले होते. तर सकाळी भरतीची वेळी तो जोरदार बरसल्याने त्याचा परिणाम होऊन अनेक भागात पाणी शिरले.
घोडबंदर मार्गावर पुन्हा त्याचठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला होता. दुपारनंतर मात्र ने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव ठाणे महापालिका प्रशासनासह जिल्हा परिषदेनेदेखील आपल्या शाळांना सुट्टी जाहीर केली. तर खाजगी शाळांना आपल्या जबाबदारीवर पाल्यांना शाळेत सोडावे, अशी भूमिका घेतली होती. राबोडी भागात कब्रस्तानची भिंत पडल्याने पाच वाहनांचे नुकसान झाले. तर शहराच्या विविध भागात वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले. तर याच पावसात साकेत पुलाच्या रस्त्याला तडे गेल्याने येथील वाहतुकीचा वेगही मंदावला होता.
सोमवारी रात्री आणि मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेतली नाही. ठाण्यात सोमवारी मध्यरात्री पर्यंत १०४.३६ मिमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापनाने केली. मात्र, मध्यरात्रीनंतर पावसाने अधिकच जोर धरला, सकाळी पहाटे पाचवाजेपर्यंत ठाण्यात १६१.६६ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीनंतर तब्बल ५७ मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा तडाखा ठाणेकरांना बसला. ठाण्याच्या राबोडी परिसरात ३० फुटांची कोकणी कब्रस्तान, किंजल बिल्डिंग समोर, पंचगंगा रोड, राबोडी नं २, येथे कंपाउंड वॉल कोसळली. ही भिंत बाजूलाच पार्क केलेल्या गाड्यांवर पडल्याने ५ बाईक आणि एका रिक्षावर पडल्याने या वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य केले. तर घोलाईनगर येथेही नाल्याची भिंत पडून तीन घरांचे नुकसान झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मागील २४ तासांत ठाण्यात १८६.२ मिमी पाऊस पडला असून अनेक पडझाडीच्या घटना घडल्या.
मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने
डोंबिवली : पहाटेपासून कोळसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण ते एक तास उशिराने धावत होती. पावसामुळे सोमवारी घरी बसणेच पसंत केलेल्या चाकरमान्यांनी पाऊस धारा झेलत रेल्वेस्थानक गाठले. त्यामुळे कल्याण ते कसारा, कल्याण-कर्जत तसेच ठाण्यापर्यंतच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. गाड्या विलंबाने का होईना धावत असल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला.
कल्याण-डोंबिवलीमध्ये दुपारपर्यंत दमदार सरी कोसळल्या. दुपारी १२ नंतर जोर काहीसा कमी झाला. मात्र, लोकल विलंबाने धाव असल्याने प्रवासी, सकाळी घराबाहेर पडलेले शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे हाल झाले. ठिकठिकाणी पावसाची संततधार कायम असल्याने मुंबई परिसरातून लोकल डाउनमार्गे येण्यास विलंब झाला होता. त्याचा परिणाम वेळापत्रकावर झाला.
डोंबिवली स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावरील पत्र्याच्या शेडमधून गळणाºया पाण्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागला. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक एकला जोडणाºया मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या पायºयांची डागडुजीची आवश्यकता आहे. या पुलावरून जाताना प्रवाशांना त्रास होत आहे. ठाकुर्ली स्थानकातही जुन्या पादचारी पुलावर तिकीट घराजवळ पावसाचे पाणी साचत आहेत. त्यामुळे प्रवाशांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
जुन्या पत्रीपुलावरून अवजड वाहनांना बंदी
कल्याण : शहरातील ब्रिटिशकालीन जुन्या पत्रीपुलीवर सध्याच्या मुसळधार पावसात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावरून जड-अवजड वाहनांना वाहतूकीस पूर्ण वेळ मज्जाव करण्यात आला आहे. ही वाहने रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान नवीन पत्रीपुलावरून वळवण्यात येत असल्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.कल्याणमध्ये रेल्वे मार्गावर पत्रीपूल उभारण्यात आला आहे. जुन्या पुलावर खड्डे पडले आहेत. अलिकडेच एका खड्ड्यात एका मोठ्या वाहनाचे चाक अडकल्याने अर्धा तास कोंडी झाली होती. ट्राफिक वार्डनने हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मागील दोन दिवसातील पावसामुळे तो आणखी मोठा झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, सुचकनाका येथून जुन्या पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास-दुर्गाडीच्या दिशेने वाहने जातात. मात्र, आता ती नवीन पुलावरून वळवण्यात येतील, असे वाहतूक विभागाने मंगळवारी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. जुन्या पत्रीपुलाचे नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती होईपर्यंत, हा वाहतुकीतील बदल राहणार आहे.
तब्बल ८६ तक्रारी
आपत्ती व्यवस्थापनाकडे ८६ तक्रारी आल्या. यात सहा आगीच्या तुरळक घटना, १० झाड पडल्याच्या, ३८ ठिकाणी पाणी जमल्याच्या भिंत कोसळल्याच्या ४ , नाल्याच्या दोन भिंती पडल्याच्या घटना होत्या.
मंगळवारी दुपारी घोडबंदर भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने काजुपाडा येथे वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला होता. त्यामुळे या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.