प्रवाशांना फटका... मेगाब्लॉक आणि पावसाचाही
By admin | Published: June 26, 2017 01:33 AM2017-06-26T01:33:33+5:302017-06-26T01:33:33+5:30
ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजवल्याचे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक सहा तास बंद असल्याने पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेने जादा बस सोडण्याचे केलेले नियोजन फसले आणि रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लूट केली. त्या काळात पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
सकाळी ९ ते दुपारी तीनपर्यंत धीम्या मार्गावरील आणि सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील, असे र्लेवने जाहीर केल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानकादरम्यान केडीएमटीच्या बस सोडण्याचे नियोजन होते. पण ते नेहमीप्रमाणे फसले. त्यामुळे रिक्षेचा आसरा घेण्यावाचून प्रवाशांकडे पर्याय उरला नाही.
रात्रभर पाऊस पडत असल्याने आणि कळवा स्थानकादरम्यान रूळांत पाणी भरल्याने हा मेगाब्लॉक होणार की नाही, याबद्दल सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. पण पावसाचा आणि तुंबलेल्या पाण्याचा जोर ओसरू लागल्याने रेल्वेने ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. रविवार आणि पावसामुळे नेहमीपेक्षा कमी प्रवासी असले तरी पर्यायी वाहतुकीचे नियोजन कोलमडले. अंबरनाथहून-उल्हासनगर आणि उल्हासनगरहून कल्याणचे रिक्षाभाडे एरव्ही प्रत्येक प्रवाशासाठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जाते. त्यात काही ठिकाणी पाच रूपये जादा घेतले गेले. पण कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांनी टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीकडे जाण्यासाठी २०० ते ३०० रुपये भाड्याची वसूली केली. कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवलीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून शेअर भाडे २४ रुपये घेतले जाते. ते रविवारी ३० ते ५० रूपये उकळण्यात आले. कल्याण, डोंबिवली स्थानकात खूप कमी रिक्षा होत्या. त्यातच पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होती.
प्रवाशांनी बससाठी कल्याण डेपोत गर्दी केली. तेथून सुटणारी प्रत्येक बस भरलेली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेकडून डोंबिवली ते कल्याणदरम्यान दहा विशेष बस चालविण्यात आल्या. ठाकुर्लीतील रेल्वे प्रवाशांची कल्याण किंवा डोंबिवली या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खूप तारांबळ झाली.