दहिसर चेकनाका येथे दुसऱ्या दिवशीही वाहतुक कोंडी कायम; मुंबई पोलिसांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 09:02 PM2021-06-02T21:02:54+5:302021-06-02T21:03:00+5:30
१ जूनपासून कोरोना नियम शिथिल केले असले तरी दहिसर चेकनाका येथे मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.
मीरारोड - शासनाने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्या मुळे निर्बंधात सुद्धा शिथिलता आणल्याने विविध कामा निमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढून दहिसर चेकनाका येथे मुंबईला जाण्यासाठी वाहनांची लांबच लांब रांग लागत आहे. ह्यामुळे लोकांना काही तास वाहन कोंडीत अडकून पडावे लागत असून बुधवारी सुद्धा परिस्थिती कायम होती . त्यातच बेजबाबदार वाहन चालक वेडीवाकडी नियमबाह्यपणे वाहने दमटवत असल्याने वाहन कोंडीत प्रचंड भर पडून कोंडी काढणे जिकरीचे ठरत आहे.
१ जूनपासून कोरोना नियम शिथिल केले असले तरी दहिसर चेकनाका येथे मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर पडलेल्या लोकांना आळा घालण्यासह बाहेरून येणाऱ्यांची चौकशी केली जात असल्याने मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत . यात रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडत आहेत . आधीच कोंडी त्यात रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी मीरा भाईंदरचे वाहतूक पोलीस , वॉर्डन यांची चांगलीच दमछाक होत आहे . तर लोक सुद्धा तास न तास वाहनात अडकून पडत असल्याने संताप व्यक्त करत आहेत.