Local Train Status: पेंटाग्राफमध्ये अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:56 AM2019-07-18T04:56:08+5:302019-07-18T04:56:18+5:30

बदलापूरहून सकाळी ८.११ वाजता सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने वायर तुटल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.२८ वाजता घडली.

Traffic jam due to overload wire collapsed in the pentagram | Local Train Status: पेंटाग्राफमध्ये अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

Local Train Status: पेंटाग्राफमध्ये अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

Next

डोंबिवली : बदलापूरहून सकाळी ८.११ वाजता सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने वायर तुटल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.२८ वाजता घडली. या घटनेत दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. कल्याण रेल्वे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कल्याण ते अंबरनाथदरम्यान दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांनी रुळांतून वाट काढत कल्याण गाठले. तर, काही जण विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथून वाहनाने कल्याणपर्यंत गेले. यामुळे अंबरनाथ-बदलापूरदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने कल्याण ते अंबरनाथ मार्गावर तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला.
ऐन गर्दीच्या वेळेत कर्जत, नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या स्थानकांतील प्रवाशांचे हाल झाले. कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन सेवेने प्रवाशांसाठी कल्याण ते बदलापूरदरम्यान १२ बस सोडल्या. मात्र, हजारो प्रवाशांच्या तुलनेत ही सेवा अत्यंत तोकडी पडली.
लोकल वेळेवर न आल्याने कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा स्थानकांतही प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली होती. सकाळी ८.३० नंतर कर्जतहून मुंबई दिशेकडे एकही लोकल धावली नाही. तेथील प्रवाशांनी कशीबशी नजीकची स्थानके गाठली. अनेकांनी कल्याण स्थानक गाठल्याने तेथे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावर तोडगा म्हणून अखेरीस मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाºया चार लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून आहे त्याच तिकीट, पासवरून प्रवासाची मुभा दिली. या गाड्या डोंबिवली, ठाणे आणि दादर स्थानकांतही थांबविण्यात आल्या. त्यामुळे या स्थानकांतील हजारो प्रवाशांनी या एक्स्प्रेसने प्रवास केला.
कल्याण स्थानकात एरव्ही फलाट क्रमांक पाच-सहावर येणारी राज्यराणी एक्स्प्रेस फलाट क्रमांक तीनवर आल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसही बदलापूर स्थानकात थांबवली. बदलापूर ते दिवा स्थानकांमधील गर्दी सकाळी ११ पर्यंत कमी झालेली नव्हती. डोंबिवलीत फलाट क्रमांक पाच, तर कल्याणमध्ये फलाट तीन, सहा आणि सातवर प्रवाशांची झुंबड उडाली होती.
रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणेद्वारे प्रवाशांना सूचना देण्यात येत होत्या. मात्र, तरीही सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. साधारण १० वाजल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ-कर्जत मार्गावर, तसेच कल्याण-सीएसएमटी मार्गावर १२ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या लोकलही प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या होत्या. कल्याण आणि डोंबिवली स्थानकांत फलाट दोनवरून विशेष लोकल सोडल्या. अखेरीस सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लोकल सुरू झाली. पण दिवसभर लोकल तासी ३० किलोमीटर या वेगानेच सोडल्या गेल्या. कल्याण-अंबरनाथ, कर्जत मार्गावरील १० लोकल फेºया रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
>जखमींची माहिती दडवण्याचा प्रयत्न
या घटनेमध्ये जखमी झालेल्या एका महिलेचे नाव पायल बघलानी (रा. उल्हासनगर) आहे. तर, दुसºया महिलेचे नाव मात्र समजू शकलेले नाही. आधी मध्य रेल्वेने जखमींची माहिती दडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जखमींचे फोटो व्हायरल होताच वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, पण तेही नाव मात्र सांगू शकलेले नाहीत. दरम्यान, कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडल्याचे सिंग म्हणाले.
>कामाचा दर्जा सुधारा
मध्य रेल्वेवरील समस्यांचे ग्रहण सुटावे, यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच नवग्रहांचे पूजन केले होते. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच ही घटना घडल्याने नेटीझन्सने रेल्वेने कामाच्या दर्जावर लक्ष द्यावे, पूजाअर्चा करून काही होत नाही, अशी सडकून टीका केली.

Web Title: Traffic jam due to overload wire collapsed in the pentagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.