मोटारीने पेट घेतल्याने ठाण्यात घाेडबंदर राेडवर वाहतूक काेंडी
By जितेंद्र कालेकर | Published: October 11, 2023 08:42 PM2023-10-11T20:42:51+5:302023-10-11T20:43:39+5:30
पातलीपाडा ते कोपरी रेल्वे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर राेडवरील पातलीपाडा भागात बुधवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास एका मोटारकारने अचानक पेट घेतला. त्यामुळे पातपीलापाडा ते कोपरी रेल्वे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून घोडबंदर आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे माेठया प्रमाणात झाले. अवघ्या १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे ३० ते ४५ मिनिटांचा अवघधी लागत हाेता.
घोडबंदरच्या दिशेने जाणारी एक मोटारकार पातलीपाडा चौकाजवळ आली असता, त्या मोटारीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम या पथकांकडून सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे पातलीपाडा ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलापर्यंत माेठया प्रमाणात वाहतूक काेंडी झाली हाेती. मुंबईहून रात्री हजारो नोकरदार त्यांच्या खासगी वाहनाने ठाणे, घोडबंदर आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करीत असतात.
वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तासांचा अवधी लागत हाेता. त्यामुळे सायंकाळी मुंबईतून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बस, खासगी माेटारकारसह रिक्षामध्ये बराच काळ काढावा लागला. यादरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेच्या पाेलिसांसह वाहतूक मदतनिसांना वाहतूकीचे नियमन करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.