मुंबई-नाशिक महामार्गावर दोन तासांपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:26 IST2025-01-05T10:25:39+5:302025-01-05T10:26:19+5:30
Mumbai-Nashik Highway: मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी 7.वाजे पासून वाहतूक कोंडी झाली असून 2 तासा नंतर देखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटत नाही

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन तासांपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
- शाम धुमाळ
कसारा - मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली असून, दोन तासांनंतरदेखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असून काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास व्यत्यय येत आहे.
पहाटेच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील झीरो पॉईंट वळणावर एक कंटेनर पलटी झाला होता. सदर कंटेनर पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरु असतानाच एक मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने.आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जव्हार फाटा येथे पोहचले. त्यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने छोटी वाहने पर्यायी रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही बेशिस्त वाहन चालकांमुळे ओव्हर टेक च्या घाईत तो रस्ता पण जाम करण्यात आला.
रविवार असल्याने प्रचंड गर्दी लक्षात घेता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी कसारा पोलिसांना सूचना करीत वाहतूक कोंडी सोडविण्याचे आदेश दिले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावित यांनी कसारा घाटात पोलिसांची कुमक पाठवून महामार्ग पोलीस घोटी केंद्र,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांच्या सोबत मदत कार्य सुरु केले. तर रस्त्यात बंद पडलेला ट्रक व पलटी झालेला कंटेनर बाजूला घेण्यासाठी क्रेन च्या मदतीने टोल पेट्रोलिंग व पॉकेस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान सकाळी 7 वाजे पासून वाहनचालक, विकेंड चा आनन्द् घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडी मुळे मनस्ताप सहन करावा लागत असून मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे विस्कळित झाली आहे. मार्गिकेवर 2 किलोमीटर पर्यंत रांगा गेल्या असून, ट्राफिक सुरळीत करण्यासाठी , कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी,महामार्ग पोलीस,घोटी ,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य तब्बल दोन तास मेहनत घेत आहेत.
.