मालगाडी बंद पडून वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:56 AM2019-11-10T04:56:46+5:302019-11-10T04:56:52+5:30
मध्य रेल्वेमार्गावरील आसनगाव ते कसारादरम्यान मालगाडीचे इंजीन बंद पडल्याने शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.
कसारा : मध्य रेल्वेमार्गावरील आसनगाव ते कसारादरम्यान मालगाडीचे इंजीन बंद पडल्याने शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. आटगावजवळ सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे कसाऱ्याकडे जाणाºया दोन लोकल रद्द करण्यात आल्या. तसेच या मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचाही खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
कसारा येथून अन्य इंजीनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर या मार्गावर वाहतूक सुरू झाली. यादरम्यान ११.१७ आणि ११.५७ च्या दोन कसारा लोकल रद्द करून आसनगाव येथूनच मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. तर, कसाºयाहून मुंबईकडे जाणाºया लोकलही उशिराने धावत होत्या. मुंबईहून आलेल्या गोदान एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस आणि काझीपेठ एक्स्प्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत होत्या.
ऐन गर्दीच्या वेळी कसारा लोकलच्या आधी मालगाडी रवाना केली जाते. त्यामुळे दररोजच काहीना काही समस्या उद्भवून लोकलसेवा विस्कळीत होतात. त्यामुळे कसारा लोकल आसनगावला रद्द केल्याने प्रवाशांनी आसनगाव स्टेशनमास्तरांना घेराव घालून जाब विचारला. मध्य रेल्वेच्या दुर्लक्षामुळे प्रवासी आणि नोकरदारांना त्रास होत आहे.
>कल्याण-कसारादरम्यान रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीचा दररोज फटका बसत आहे. त्यामुळे अनेक नोकरदारांना लेटलतीफचा शेरा मिळत आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा- कर्जत रेल्वे प्रवासी संघ