भिवंडीतील वाहतूक कोंडी, ड्रग्स विक्रीची समस्येपायी आ. रईस शेख यांनी घेतली ठाणे पोलिस आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 07:06 PM2021-02-18T19:06:38+5:302021-02-18T19:08:18+5:30
Bhiwani's MLA Raees Shaikh meets to thane police commissioner : भिवंडीतील रंजणोली फाटा ते कल्याण नाका, कल्याण नाका ते एसटी डेपो, शांतीनगर रास्ता आणि वंजारपट्टी नाका पूल इत्यादी महत्वाच्या रस्त्यांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आमदार शेख यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहराचे औद्योगिक महत्व आणि त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या, सोबतच शहराचे आधुनिकीकरण आणि प्रगती पथावरील रस्त्याची आणि मेट्रो मार्ग निश्चितीची कामे यामुळे आधीच अरुंद, छोटे व निमुळते असणारे रस्ते अधिकच अरुंद झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. रोज होणाऱ्या या वाहतूक कोंडी समस्येमुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर शहरात अनेक ठिकाणी अवैध गुटखा व नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याने तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याने सदरच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी ठाणे पोलिस आयुक्त यांची गुरुवारी भेट घेतली व या समस्यांवर तोडगा काढण्याची लेखी विनंती व सूचना आ.शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
भिवंडीतील रंजणोली फाटा ते कल्याण नाका, कल्याण नाका ते एसटी डेपो, शांतीनगर रास्ता आणि वंजारपट्टी नाका पूल इत्यादी महत्वाच्या रस्त्यांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आमदार शेख यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्याचसोबत भिवंडी शहरातील नागरिकांच्या तक्रारीनुसार वाढती व्यसनाधीनता आणि नशेच्या पदार्थांची करण्यात येणारी सर्रास विक्री तात्काळ बंद करण्याबाबत आ. शेख यांनी आग्रही भूमिका मांडली. तसेच भिवंडीतील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शहरामध्ये काही ठिकाणी एक्सपायरी डेट संपलेल्या खाद्यपदार्थांची देखील विक्री होत असल्याचे आ.रईस शेख यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताच आयुक्तांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना होणाऱ्या विक्रीची चौकशी करून शहरातील वाहतूक कोंडीसमस्येवर तोडगा काढण्यात येईल तसेच शहरातील अवैध नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून सदरचे अवैध धंदे थांबविण्यात येतील असे आश्वासन ठाणे पोलीस आयुक्तांनी आपल्याला दिले आहे अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.