ठप्प लोकलसेवेमुळे होतेय महामार्गावर वाहतूककोंडी; चाकरमान्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:16 AM2020-09-12T01:16:08+5:302020-09-12T01:16:16+5:30
लाखोंच्या संख्येने वाहने रस्त्यांवर, प्रदूषणाच्या पातळीत वाढ
पारोळ : कोरोना महामारीमुळे साडेपाच महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प असल्याने सामान्य चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लाखोंनी प्रवासी एकट्या लोकलसेवेमुळे मुंबईत पोहोचवले जातात, मात्र साडेपाच महिन्यांपासून लोकलसेवा ठप्प असल्याने त्याचा भार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. लाखोंच्या संख्येने वाहने महामार्गावर येत असल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा ताण महामार्गावर येत आहे.
महामार्गावर नेहमीच होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कामावर ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची पुरती दमछाक होऊ लागली आहे. लोकलसेवा कधी सुरू होईल आणि चाकरमान्यांचा जीव कधी भांड्यात पडेल, याचा नेम नसल्याने चाकरमानी धास्तावला आहे. तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर उतरत असल्याने प्रदूषणाच्या पातळीतदेखील वाढ झाली आहे.
शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा अद्याप ठप्पच आहे. सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांना एस.टी. महामंडळ आणि खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बºयाच कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले आहेत. त्यात खाजगी वाहनांनी लांबवरचा प्रवास करताना पगारातील मोठा हिस्सा प्रवासावर
खर्च होतो. अशा वेळी उरलेल्या पगारात महिनाभर कुटुंबाचा खर्च भागवण्याची कसरत चाकरमान्यांना करावी लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याने नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. वाहनांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. सुरुवातीला कडक लॉकडाऊन असल्याने प्रदूषणाच्या पातळीचा थर खाली आला होता, मात्र लोकल सेवा ठप्प असल्याने आता पुन्हा वाहनांच्या प्रचंड ताणामुळे महामार्गावरील प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच दररोज होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कोरोना संसर्गाचा धोकादेखील वाढला आहे. बरेचसे चाकरमानी आपल्याकडील दुचाकी, चारचाकीने मुंबईसारख्या ठिकाणी कामावर जातात. अशा वेळी कामावर लवकर पोहोचण्याच्या बेतात ही मंडळी मिळेल तसा शॉर्टकट मारतात आणि वाहतूककोंडीचे विघ्न वाढवून ठेवतात. महामार्गावरील वाढती प्रचंड वाहतूककोंडी अनेक समस्यांना आव्हान देणारी ठरली आहे.
सद्य:स्थितीत शासनाने लोकलसेवा ठप्पच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. कामाच्या ठिकाणी जाताना त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. लांबवरचा प्रवास असल्याने खर्चदेखील दुप्पट होतो. गंभीर आजाराच्या रुग्णांनादेखील अत्यावश्यक लोकलसेवेत प्रवेश नसल्याने त्यांच्या हालात भर पडत आहे. शासनाने निदान त्यांना तरी लोकलसेवेमध्ये प्रवेश द्यावा. तसेच शासनाला जितक्या लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करता येईल, तितके ते सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याचे राहील. तसेच कोरोनावर कधी लस विकसित होईल, ते निश्चित सांगता येत नाही. अशा काळात चाकरमानी बेरोजगार होऊ नये, यासाठी शासनाने वेळीच पावले उचलून लोकलसेवा सुरू केली पाहिजे.