वाहतूक कोंडी; मनसेचे आमदार राजू पाटील उतरले रस्त्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 10:03 PM2020-10-22T22:03:14+5:302020-10-22T22:05:07+5:30
MNS MLA Raju Patil : रस्त्याची वाहतूक दोन दिवसात सुरळीत झाली नाही तर रस्त्याचे काम बंद पाडणार, असा इशारा आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिका-याना दिला आहे.
कल्याण : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहन चालक झाले आहे. दररोज सहा तास वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडतात. या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. कंत्रटदाराकडून वेडेवाकडेपणाने काम सुरु आहे. याचा जाब विचारण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे आज सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी प्रकरणी चांगलेच फैलावर घेतले. रस्त्याची वाहतूक दोन दिवसात सुरळीत झाली नाही तर रस्त्याचे काम बंद पाडणार, असा इशारा आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिका-याना दिला आहे.
वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सहा ते आठ तास लोक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. यापूर्वी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. आत्ता पुन्हा रस्त्याचे सहा पदरीकरण सुरु आहे. कंत्रटदाराकडून सेफ्टी नॉर्मस पाळले जात नाही. कामाच्या ठिकाणी बॅरीकेटस लावलेले नाही. पोलिसांकडून या रस्त्यावर अवजड वाहने सोडली जातात. अवजड वाहने सोडण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सात अशी आहे.
नवी मुंबई व कल्याणच्या दिशेने रस्त्यावर अवजड वाहने सोडली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यात कंत्रटदाराचे काम वेडेवाकडे सुरु आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांनी जाब विचारात वाहतूक पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांना वाहतूक कोंडीत मार्ग काढण्यासाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे सामान्य नागरीकांची वाहतूक कोंडीत काय हालत होत असेल याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.
यावेळी पोलिस निरिक्षक सुरेश लाभभाते यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी होत असल्याने वॉर्डन वाढवून मागितले होते. ही मागणी वारंवार करुन देखील त्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर कोरोनामुळे नोटिफिकेशन रखडले होते. ते उद्यापर्यंत काढण्यात येईल.