Traffic Jam in Thane: आधीच रस्त्यात खड्डे, त्यात ट्रक बंद पडल्याने मुंबई - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:34 PM2021-07-17T17:34:17+5:302021-07-17T17:55:14+5:30
Traffic Jam in thane: ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर आधीच खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र रोजच्या रोज दिसत आहे. त्यात शनिवारी या भागात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तिनहात नाक्यार्पयत गेल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या खडय़ांमुळे शहराच्या विविध भागात तसेच इतर ठिकाणी देखील वाहतुक कोंडीचा ताप वाहन चालकांना सहन करावा लागल्याचे चित्र शनिवारी ठाण्यात दिसून आले. त्यात साकेत उड्डाणपुलाखालीच ट्रक बंद पडल्याने या वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिनहात नाका ते नाशिककडे जाणा:या मार्गावर वाहतुक कोंडीचा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागला. जवळ एक तास ही कोंडी फुटल्याचे दिसून आले नाही. त्यात जिल्ह्याच्या इतर ठिकाणी देखील रस्त्याला खड्डे पडले असल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले होते.
ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर आधीच खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र रोजच्या रोज दिसत आहे. त्यात शनिवारी या भागात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तिनहात नाक्यार्पयत गेल्याचे दिसून आले. हा ट्रक काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्यातही या मार्गावर पडलेल्या खडय़ांचा ताप नाहक वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसापूर्वीच या मार्गावरील खडय़ांना तात्पुरता मुलामा लावण्यात आला होता. परंतु पाऊस पडताच हा मुलामा वाहुन गेल्याने पुन्हा या मार्गावर खड्डे पडले आहेत. या संदर्भात ठाणो वाहतुक पोलिसांच्या वतीने एमएसआरडीसी, बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु आज करु उद्या करु अशी कारणो सांगून खड्डे काही बुजविले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच वाहतुक कोंडी होत असल्याचेही सांगितले जात आहे.
(फोटो - विशाल हळदे)
शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, कोपरी पूल आणि शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी ४ नंतरही या मार्गांवर वाहतूक कोंडी असल्याचे चित्र होते. या वाहतूक कोंडीमुळे अवघे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांवर २० ते २५ मिनीटे लागत होती. अनेकांना कामाच्या ठिकाणीवेळेवर पोहचता आले नाही.
या मार्गावर खड्डे पडल्याने तसेच अचानक ट्रक बंद पडल्याने येथे वाहतुक कोंडी झाली होती. त्याठिकाणावरील ट्रक बाजूला काढण्यात येऊन, वाहतुक कोंडी सोडविण्यात आली आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी संबधींत यंत्रणोला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
(बाळासाहेब पाटील - पोलीस उपायुक्त, वाहतुक विभाग ठाणे)