माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत; रायते पुलावरून अवजड वाहनांना बंदी
By सुरेश लोखंडे | Published: August 8, 2019 06:55 PM2019-08-08T18:55:05+5:302019-08-08T20:55:40+5:30
पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळल्या असून झाडेही उन्मळून पडली होती. दाट धुके आणि प्रचंड पाऊस यामुळे ती हटवण्यात अडथळा निर्माण झाला. अखेर घाटातील महामार्गावरील मातीचे ढिग व झाडे हटवून बुधवारी संध्याकाळ घाटातील ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तर रायते पुलावरून अवजड वाहनांना मात्र बंदी घालण्यात आली आहे.
या घाटातील महामार्गावरील सावर्णे गांवाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळल्या. तर काही झाडेही उन्मळून पडले होते. सोमवारपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. या कामाची पाहाणी करून पोलीस व प्रशासनाकडून बुधवारी संध्याकाळी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे सुतोवाच कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले. घाटात सध्या पावसाचा जोर मंदावलेला असला तरी दाट धुके आह. या समस्येमुळे घाटातील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. दिवसा देखील चालकांना वाहनांचे लाईट लावावे लागत आहेत.
पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या महामार्गाने घाटातून जाणारी सर्व अवजड वाहने भिवंडी मार्गे पडघा, टिटवाळा आणि गोवेली येथून पुढे या राष्ट्रीय मार्गाने घाटातून जात आहे. याशिवाय याच मार्गाने तिकडून येणारे बससह सर्व अवजड वाहने त्यांच्या इच्छित स्थळी जात असल्याचे वास्तव दिसून आले. सततच्या पावसामुळे घाटातील दरडी ढिसाळ झाल्यामुळे माती रस्त्यावर पडू नये यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे. महामार्गावरील या घाटातील आवळ्याची वाडी, मोरोशी, सावर्णे, या भागात दरडींची माती ढासळून पडल्याची शक्यता असल्याचेही दिसून येत आहे.