उल्हासनगरात वाहतूक पोलीस व टोइंग गाडी व्यापाऱ्यांचा टार्गेटवर
By सदानंद नाईक | Published: January 12, 2024 04:19 PM2024-01-12T16:19:16+5:302024-01-12T16:21:02+5:30
व्यापाऱ्यांची दादागिरी भर रस्त्यात पोलिसाना शिवीगाळ, टोइंग गाडीच्या कर्मचाऱ्याला मारहाण.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केटात गाडीची काच फोडल्याच्या रागातून काही व्यापाऱ्यांनी गुरवारी वाहतूक पोलीसाला भररस्त्यात शिवीगाळ व टोइंग गाडीवरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे व्यापाऱ्यांची दादागिरी उघड होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
शहरात विठ्ठलवाडी व उल्हासनगर असे दोन वाहतूक पोलीस विभाग कार्यरत असून त्यांच्यावर वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी आहे. शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने, मार्केट परिसरात दुकाना समोरच वाहने पार्किंग केली जातात. मात्र पार्किंग केलेली वाहने नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्याने, टोइंग गाडी असे वाहने उचलून दंडात्मक कारवाई करते. व्यापाऱ्यांनी टोइंग गाडी विरोधात आंदोलन करून दोन्ही विभागाची टोइंग गाडी बंद पाडली.
दिवाळी सणा दरम्यान विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस विभागाने टोइंग गाडी सुरू केली. त्यापाठोपाठ उल्हासनगर विभागाने गेल्या आठवड्यात टोइंग गाडी सुरू करताच, व्यापाऱ्यांनी आमदार कुमार आयलानी यांचे संपर्क कार्यालय गाठले. आमदार आयलानी यांनी वाहतूक पोलीस विभाग व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी गाडी बंद करता येत नाही. अशी भूमिका सहायक पोलिस आयुक्त रमेश पवार यांनी घेताच, व्यापारी संतप्त झाले. यावेळी आयलानी व पोलीस अधिकाऱ्यात तू तू मैं मैं झाली. अखेर राजकीय दबाव व व्यापाऱ्यांच्या विरोधा पुढे टोइंग गाडी वाहतूक पोलीस विभागाला बंद करावी लागली आहे.
शहर पूर्वेत मात्र टोइंग गाडी सुरू होती. गुरवारी मार्केट मध्ये एका गाडीची काच टोइंग गाडीवरील कर्मचाऱ्याने फोडली म्हणून काही जणांनी भर रस्त्यात वाहतूक पोलीस, टोइंग गाडीवरील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. पोलिसांच्या गणवेशा पर्यंत हात नेऊन टोइंग गाडीवरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे व्यापाऱ्यांची दादागिरी पुढे आली. तर दुसरीकडे पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार नसल्याने, पोलीसावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात सुरू झाली.
महिलेचे कौतुक :
वाहतूक पोलिसांला अडवून शिवीगाळ होत असताना एका महिलेने पोलिसांची बाजू घेतली. त्या महिलेचे सर्वस्तरातून कौतुक हिट आहे.
व्यापाऱ्यांची दादागिरी:
मार्केट मध्ये दुकांनासमोरील फुटपाथवर दुकानदार सर्रासपणे साहित्य ठेवत असून त्यापुढे नागरिकांना दुकानात येण्यासाठी लोखंडी जाळी ठेवत आहेत. त्यापुढे गाडी पार्किंग केल्या जातात.