रिक्षाचालकाकडून लाच घेणाऱ्या टोइंग कर्मचाऱ्यासह वाहतूक पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 08:23 PM2021-02-10T20:23:53+5:302021-02-10T20:27:41+5:30
नो पार्किंगमधील रिक्षा उचलून नेल्यानंतर ती सोडविण्यासाठी रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांची लाच घेणारा वाहतूक शाखेचा पोलीस हवालदार गोकुळ झारखंडे (५२) आणि टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी सुमित पवार (२५) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नो पार्किंगमधील रिक्षा उचलून नेल्यानंतर ती सोडविण्यासाठी रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांची लाच घेणारा वाहतूक शाखेचा पोलीस हवालदार गोकुळ झारखंडे (५२) आणि टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी सुमित पवार (२५) यांना ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टनाका येथे नोपार्किंगमधील एका रिक्षावर ९ फेब्रुवारी रोजी वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटचा पोलीस हवालदार झारखंडे याने कारवाई करून ती उचलून नेली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालक ती सोडविण्यासाठी पोलीस ठाणेनगर वाहतूक शाखेच्या पोलीस कवायत मैदान येथील कार्यालयाजवळ गेला. तेव्हा झारखंडे याने दंडाची रक्कम जास्त असून त्यांच्याकडून चारशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीनशे रुपये देण्याचे ठरले. पैसे आणायला जातो, असे सांगून या रिक्षाचालकाने थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून ही आपबिती कथन करून तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा तो ठाणेनगर कार्यालय परिसरात आला असता, गोकुळ याने टोइंग वाहनावर काम करणाऱ्या सुमित पवार याला ही ३०० रुपयांची लाच स्वीकारण्यास सांगितले. सुमितला लाचेची रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.