वाहतूक पोलीस लावणार १०५ बेवारस वाहनांची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:43+5:302021-09-12T04:45:43+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर - वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिमीरा वाहतूक शाखेकडून विविध कारणांनी जप्त केलेल्या १०५ वाहनांची विल्हेवाट लावली ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर - वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिमीरा वाहतूक शाखेकडून विविध कारणांनी जप्त केलेल्या १०५ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
वाहतूक शाखेने रस्त्यावर किंवा कडेला बेवारस पडलेली वाहने, पादचारी व वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने जप्त करण्याची कारवाई गेल्या काही वर्षांपासून चालवली आहे. अशा पडीक वाहनांमुळे पालिकेस दैनंदिन साफसफाई करण्यास अडथळा येत असतो. वाहतूक शाखेने अशा बेवारस वाहनांवर कारवाई करून ती मीरा गाव एमआयडीसी पाण्याच्या टाकीजवळील पालिका भूखंडावर ठेवली आहे. अनेक वाहने तर कोणी दावा करायला न आल्याने गंजून गेली आहेत. शिवाय जागा व्यापली जात असल्याने कारवाई केलेल्या अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे.
वाहतूक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनांपैकी ६७ रिक्षा आणि ३८ दुचाकी अशी १०५ वाहने तर पूर्ण गंजून गेली आहेत. त्यांचे इंजीन क्रमांक, चेसिस क्रमांक व नोंदणी क्रमांक मिळून येत नसल्याने येत्या १५ दिवसांत सदर वाहनांबाबत मूळ कागदपत्रांसह कोणी दावा न केल्यास त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.