महापौरांच्या स्वेच्छा निधीतून वाहतूक पोलिसांना मिळाले १८१ जॅमर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:26 PM2021-06-12T18:26:06+5:302021-06-12T18:26:25+5:30
बेकायदेशी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दिले जॅमर.
मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या चारचाकी आणि अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी त्यांच्या महापालिकेतील स्वेच्छा निधीतून १८१ व्हील जॅमर वाहतूक पोलिसांना सुपूर्द केले .
मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न गंभीर असून यामुळे वाहतुकीला अडथळा, पादचाऱ्यांना चालण्यास अडचण होऊन वाहतुकीची कोंडी वाढते. वाहतूक पोलिसांकडून पालिकेच्या ट्रॅफिक वॉर्डनसह खाजगी टोईंगद्वारे दुचाकीवर आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाते.
परंतु चारचाकी आणि अवजड वाहनांवर कारवाईसाठी जॅमर कमी पडत असल्याने प्रभावी कारवाई शक्य होत नाही. त्या अनुषंगाने महापौरांनी शहरात होणारी अनधिकृत वाहन पार्किंग रोखण्याकरिता पालिकेतील महापौर स्वेच्छा निधीतून वाहतूक पोलिसांना १८१ जॅमर उपलब्ध करून दिले. शनिवारी ते वाहतूक पोलिसांच्या काशिमीरा कार्यालयात महापौरांच्या हस्ते पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.