ठाण्यात वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम: बेघरांना केले अन्नाचे वाटप

By जितेंद्र कालेकर | Published: March 26, 2020 10:42 PM2020-03-26T22:42:16+5:302020-03-26T22:48:05+5:30

एकीकडे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची लाठी उगारली जात असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांमधून व्हायरल होत असतांनाच ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ठिकठिकाणी अन्नाचे वाटप तसेच रस्त्यामध्ये अडकलेल्यांना मदतीचा हात देऊन केलेल्या अनोख्या कामगिरीचेही कौतुक होत आहे.

Traffic police station in Thane: Food distributed to the homeless | ठाण्यात वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम: बेघरांना केले अन्नाचे वाटप

गरोदर महिलेलाही दिला मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्देबाहेर जिल्हयातील रहिवाशाला केली आर्थिक मदतगरोदर महिलेलाही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केवळ नागरिकांची तपासणी किंवा त्यांना अटकाव न करता योग्य कारणे जाणून घेतल्यानंतर मदतीचा हातही पुढे केला आहे. भिवंडी आणि कोपरीमध्ये काही बेघरांना जेवणाचे पॅकेटसही देण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकात अडकलेल्या धुळयातील रहिवाशाला आणि वागळे इस्टेट येथील एका गरोदर महिलेला खासगी वाहनाचीही गुरुवारी उपलब्धता करुन दिल्याने पोलिसांबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काही प्रवाशी अडकल्याची माहिती कोपरी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद परदेशी यांना गुरुवारी सकाळी १० वाजता मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी त्याठिकाणी चौकशी केली. तिथे धुळयातील एक प्रवाशी दौंडमार्गे आल्यानंतर ते संचारबंदी लागू झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातच अडकल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे नाशिक या पूर्व द्रूतगती महामार्गावरुन धुळयाकडे जाणाºया एका ट्रकमध्ये परदेशी यांनी बसवून दिले. जातांना त्यांनी काही पैसेही त्यांना दिले. ठाणे रेल्वे स्थानकात कर्नाटक येथील आणखीही तिघेजण होते. त्यांची मात्र जाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे माल वाहतूक सुरु झाल्यावर त्यांना गावी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत मात्र सामाजिक संस्थांकडून पोलिसांना येणारी जेवणाची पाकिटे त्यांनी या तिघांना दिली. दरम्यान, वागळे इस्टेट येथून एक गरोदर महिला ऐरोली येथे आपल्या माहेरी जाण्यासाठी गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली. तिने ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीची मागणी केली. याची गांभीर्याने दखल घेत वाहतूक शाखेच्या वागळे इस्टेट विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन गावडे आणि कळवा विभागाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी एका खासगी वाहनावर पोलीस कॉन्स्टेबलला चालकाची जबाबदारी दिली. त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे पोलिसांनी अखेर तिला ऐरोली येथील तिच्या माहेरी सुखरुप पोहचविल्याने तिने पोलिसांचे आभार मानले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त अमित काळे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

 

Web Title: Traffic police station in Thane: Food distributed to the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.