मेट्रो पिलरमुळे वाहतुकीचा वेग मंदावला
By अजित मांडके | Published: December 4, 2023 06:27 PM2023-12-04T18:27:19+5:302023-12-04T18:27:30+5:30
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे.
ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे. त्यात शहरात आता मेट्रोच्या कामाने गती घेतली आहे. मात्र काही ठिकाणी मेट्रोचे स्थानक निर्मिती करता उभारण्यात आलेले पिलर वाहतुकीला अडचणीचे ठरत आहेत. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेत मार्गस्थ होत असलेली अवजड वाहने यामुळे मोठया प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीने अक्षरशः नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. या समस्येने नागरिक बेजार झाले असून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यातील किती कामे वेळेत पूर्ण होतील हा संशोधनाचा भाग आहे. यात मेट्रोचे काम हे सर्वात महत्वाचे आहे. या कामांचा फार मोठा फटका वाहतूकीला बसत आहे. मेट्रोचे काम कमी आणि फाफटपसाराच अधिक अशी परिस्थिती दिसत आहे. सध्या मेट्रोचे काम जलद गतीने होत आहे. मात्र मेट्रोसाठी स्थानक उभारताना त्याचे पिलर हे रस्त्याच्या मधोमध् उभारले गेले आहेत. परिणामी रस्त्याचा काही भाग या पिलरने व्यापलो जात आहे. त्याने वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे मानपाडा येथे एका खाजगी मॉलच्या ठिकाणी अशाच प्रकारे पिलर उभारला गेल्याने मागील काही दिवसापासून मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होतांना दिसून येते. जोडीला शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने एका घरात चार चार चारचाकी गाड्या झाल्या आहेत. मात्र या गाड्या पार्क करायला त्यांच्याकडे जागा नाही.
शहरातून दुपारी १२ ते ४ यावेळेत अवजड वाहनांची वाहतूक सुरु होते. या वाहतुकीने तर कित्येकदा दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यातही सर्वात मोठी अडचण म्हणजे ही वाहने त्यांच्या ठराविक वेळेपूर्वी शहराच्या सीमेवर येतात. तेव्हा तिथे त्यांना विशिष्ट ठिकाणी उभे ठेवण्याची व्यवस्थाही नाही. त्यामुळे ही वाहतूक कोंडीत अधिकची भर पडते.रात्री ही तशीच परिस्थिती असते. ठाणे शहरात अवजड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र ही वाहने रात्री ८ नंतरच प्रवेश करताना दिसतात. कधीकधी तर भर दिवसाही काही गाड्या बिनधास्तपणे शहरात शिरतात. ही अवजड आणि मोठमोठी वाहन शहरात आल्यामुळे सगळ्याच वाहनांची गती मंदावते आणि वाहतूक कोंडी व्हायला कारणीभूत ठरते.याबाबत ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सध्या सुरु असलेली मेट्रो ची कामे, तसेच दुपारच्या वेळेत होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्यामुळे काही प्रमाणावर कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.