वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेची जरब
By धीरज परब | Updated: April 18, 2025 16:11 IST2025-04-18T16:11:46+5:302025-04-18T16:11:58+5:30
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात बेशिस्त आणि अनेक राजकीय वजन असलेल्या वाहनांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेची जरब
मीरारोड- वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या तसेच वाहतूक पोलीस दिसत नाही पाहून जाणीवपूर्वक मनमानी करणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांवर आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेच्या मदतीने दंड आकारण्याची कारवाई मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने सुरू केली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात बेशिस्त आणि अनेक राजकीय वजन असलेल्या वाहनांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यातच वाहतूक पोलीस नसेल तर नियम पायदळी तुडवले जातातच पण पोलीस असला तरी त्याच्या समक्ष वा त्याला चकवा देऊन नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक देखील कमी नाहीत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात घडणे, वाहतूक कोंडीसारखे प्रकार सतत घडत असतात.
शहरातील प्रमुख नाके व रस्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. महापालिकेने कॅमेरे लावले असले तरी अनेकदा त्याचे रेकॉर्डिंगपासून देखभाल दुरुस्ती आदींचा प्रश्न असतो. मोठ्या प्रमाणातील सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे अनेक लहान मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी वाहतुकीचे उल्लंघन रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञानचा वापर करून मल्टी व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम द्वारे स्मार्ट ट्रॅफिक यंत्रणा सुरू केली आहे. सदर प्रकल्प मार्चपासुन पायलट प्रोजेक्ट म्हणुन सुरू असून त्याचे पहीले चलन ७ एप्रिल रोजी जारी करण्यात आले होते.
पोलीस आयुक्तालयातील वाढती वाहतुक, अपघाताचे वाढते प्रमाण व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारीत एक प्रगत आणि स्मार्ट वाहतुक व देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हि प्रणाली कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन वाहतुक नियमांचे उल्लंघन ओळखुन त्यावर त्वरीत कारवाई करण्यास मदत होणार आहे. सदर प्रणालीद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, ई-चलनासाठी थेट फोटो पुरावे, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुक व्यवस्था, पारदर्शक व अचूक दंड प्रणाली, अपघातांमध्ये व जनजीवनात सुधारणा असे फायदे होणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त पांडेय यांनी दिली.
सदर प्रणालीमुळे कायदयाची अंमलबजावणी करता-करता नागरिकांचे प्राण वाचविणे आणि वाहतुकिचे नियम पाळण्याची सवय होण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. ही प्रणाली शिस्त, सुरक्षा आणि तंत्रज्ञान याचे परिपुर्ण उदाहरण आहे. वाहतुक व्यवस्थापनात एक महत्वपुर्ण तांत्रिक झेप असून सध्याच्या पायाभूत सुविधांच्या मर्यादांमध्ये काम करतांना रिअल टाइम अंतर्दृष्टी देऊन कारवाईत मानवी प्रयत्न कमी करण्यासह कार्यक्षमता वाढवण्याचे उदाहरण आहे.
वाहतुकीचे उल्लंघन करतात कॅमेरामधील रेकॉर्डिंगचा मनुष्यबळ ऐवजी एआयचा वापर होत आहे. मनुष्यबळ वाचून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. सुरवातीला विना हेल्मेट, सीट बेल्ट, ट्रिपल सीट वर कारवाई सुरु केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ओव्हर स्पिडिंग, रॉंग साईड आदी उल्लंघन कॅमेरे डिटेक्ट करणार आहेत. राज्यातील हा बहुतेक पहिलाच प्रयोग असावा असे आयुक्त म्हणाले. यावेळी मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.