वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी : दुकलीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:47 PM2018-04-20T17:47:11+5:302018-04-20T17:47:11+5:30
कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबटयासह वाघ सदृश्य प्राण्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई बदलापुर पाईप लाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.

विशाल लक्ष्मण धनराज आणि सचिन जानर्दन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही ३० ते ३३ वयोगटातील असून रायगड जिल्हयातील चौक येथील रहिवाशी आहेत. दोन व्यक्ती बदलापुर पाईप लाईन रोड कोळेगांव परिसरात वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करीसाठी येणार असल्याची माहीती खब-यामार्फत मिळाल्यानंतर वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष शेवाळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ज्योतिराम साळुंखे, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विश्वास चव्हाण, अरविंद पवार, पोलिस नाईक राजेंद्र घोलप, सुरेश निकुळे, सतिश पगारे, हरिश्चंद्र बांगारा, पोलिस शिपाई अजित राजपुत आदिंच्या पथकाने सापळा लावून दोघांना कातडयांसह अटक केली. या कारवाईत कल्याण वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग वनपाल मुरलीधर जामकर, वनरक्षक संतोष रेवणे आणि वनजीव आभ्यासक सुहास पवार यांनीही सहभाग घेतला होता. अटक आरोपींविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आढळुन आलेले बिबटया सदृश्य कातडे साडेसहा फुट आहे तर वाघ सदृश्य प्राण्याचे कातडे तीन फुटाचे आहे. हे कातडे कोणत्या प्राण्याचे आहे ते समजण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाणार आहे. भारतीय बाजारात कातडयाचे मुल्य शून्य असलेतरी त्याची विक्री दहा लाखांच्या आसपास होते तर नेपाळमार्गे चीनमध्ये नेऊन देखील कातडयांची विक्री केली जाते. बाहेरच्या देशांमध्ये त्याला चौपट किंमत आकारली जाते अशी माहीती वरीष्ठ निरिक्षक जॉन यांनी दिली. दोघांनी कोठेतरी जंगलात शिकार करून मिळविले असल्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.