ठाण्यात गायमुखजवळ कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:08 PM2021-10-18T12:08:41+5:302021-10-18T12:14:56+5:30
ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ट्रेलर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सुरत (गुजरात) येथून न्हावा शेवा, नवी मुंबईकडे हा ट्रेलर २५ टन कच्चा लूम मटेरियल घेऊन जात होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास
घोडबंदर मार्गावरील गायमुखजवळ चालक तस्सुवर खान यांचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रेलर रस्त्यावरुन अचानक उलटला. त्यामुळे ट्रेलरच्या टाकीतील आॅईल घोडबंदर ते ठाणे मार्गावरील रस्त्यावर सांडले. हा अपघात गायमुख जकात नाक्याजवळील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ समोर घडला. या अपघातामुळे रस्त्यावर आॅईल सांडल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षासह कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. विशेष म्हणजे ट्रेलर पलटी होऊनही या अपघातातून चालक खान हे सुदैवाने बचावल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
* गेल्याच आठवडयात याच मार्गावरुन जाणारा सुमारे २१ टन फर्निश आॅइल घेऊन जाणारा टँकर गायमुख जकातनाक्याजवळ उलटल्याची घटना १४ आॅक्टोंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात आॅईल सांडले होते. सुदैवाने, यामध्येही कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, ठाणे अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ता सफाई करुन या मार्गावरील वाहतूककोंडी फोडली होती. परंतू, वारंवार याच मार्गावर वाहने पलटी होऊन अपघात होत असल्यामुळे या मार्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी तसेच वाहन चालकांनी केली आहे.