रेल्वेचे बुकिंग करा रद्द; अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या शाळांमुळे मनस्ताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:41 AM2022-04-02T11:41:46+5:302022-04-02T11:41:55+5:30
सुरेश लोखंडे ठाणे : शासनाने एप्रिलच्या या कडकडीत उन्हाळ्यातही शाळा पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले; पण आता ...
सुरेश लोखंडे
ठाणे : शासनाने एप्रिलच्या या कडकडीत उन्हाळ्यातही शाळा पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले; पण आता त्यातही सुधारणा करून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांना त्यांच्या परीक्षा वेळेत घेऊन सुटी घेता येणार आहे; पण ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. त्यांना मात्र एप्रिलच्या कडक उन्हातही अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्याव्या लागणार आहे. या शाळांच्या निष्काळजीमुळे पालकांना रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंग रद्द करण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे घोषित करून सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर यातून मुक्तता झाल्यामुळे आता पालकांनी गावी किंवा मुलांनी मामाच्या गावी जाण्याचा बेत आखलेला आहे. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी रेल्वेचे बुकिंग ही पालकांनी केले आहे; मात्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा सुरूच ठेवण्याचे अध्यादेश जारी केला होता. त्यामुळे पालकांना रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंग रद्द करण्याचा प्रसंग ओढवला होता; पण जारी केलेल्या अध्यादेशात सुधारणा करून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांनी त्यांच्या परीक्षा नियमितपणे घेऊन त्यांच्या पातळीवर सुटी घेण्याचे अधिकार दिले आहेत; पण अभ्यासक्रम पूर्ण नसलेल्या शाळांनी परीक्षा घेण्यासाठी प्रथम या महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेशात बदल करूनही निष्काळजी करणाऱ्या शाळांमुळे बहुतांशी पालकांना त्यांचे रेल्वेच्या आरक्षणाचे बुकिंगसह अन्यही नियोजन रद्द करण्याची वेळ आली आहे.
१) तापमान ३५ ते ४० अंशांवर
सध्या जिल्ह्याचे तापमान ३५ ते ४० अंशांवर आहे. त्यामुळे या कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. त्यात अधूनमधून या तापमानात बदल होत असल्याचे हवामान खात्याकडून सूचित करण्यात येत आहे. त्यामुळेही पालकांचा जीव टांगणीवर आहे.
२) मुलांचे आरोग्य बिघडले तर काय करणार?
जीवघेण्या उन्हाच्या कडाक्यात मुलांना दिवसभर शाळेत जावे लागणार आहे. त्यातही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा तास आणि त्यानंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची घोकमपट्टी करावी लागणार आहे. त्यामुळे दडपण येऊन मुलांचे आरोग्य बिघडण्याची शंका-कुशंका पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
३) एक मे पासून सुट्या -कोरोनामुळे दोन वर्षांपासून गावी जाऊन मनसोक्त राहता आलेले नाही; पण आता ती संधी आलेली असली तरी बालकांच्या अभ्यासक्रमासाठी आणि परीक्षांसाठी पालकांना एप्रिल महिना तणावाखालीच काढावा लागणार आहे. त्यानंतर १ मेपासूनच या कुटुंबीयांना उन्हाळ्याची सुटी घेता येणार आहे.
शिक्षक संघटना पदाधिकारी प्रतिक्रिया -
उन्हाचा पारा चाळिशीवर गेला असताना पूर्णवेळ शाळेत बसणाऱ्या लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. शाळेत होणारी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया उकाड्यामुळे सुरळीत होणार नाही. तर मग पूर्णवेळ शाळेचा हट्ट का? शाळा सकाळच्या सत्रातच भरवल्या जाव्यात.
विजय शिंदे,संयुक्त राज्य कार्यवाहक, शिक्षक भरती
‘शाळेत पूर्णवेळ थांबून अध्यक्ष करतील’
उन्हाचा तडाखा खूपच वाढला आहे. उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण असताना लहान मुले त्यात शाळेत पूर्णवेळ थांबून अध्ययन करतील का? याबाबत मला शंका वाटते. उन्हाचा विचार करून शाळा सकाळ सत्रातच भरविल्या जाव्यात.
- रोहिदास गोदडे, भावसे, ता. शहापूर
मुलांना उन्हाचा होतोय त्रास
शाळांना पूर्ण तासिका घ्यायचे आदेश असल्याने शाळा भर दुपारी सोडल्या जात आहेत. त्यामुळे मुले दुपारी उन्हात खेळत उड्या मारत घरी येत आहेत. याचा त्यांना त्रास होत आहे. मुलांच्या आरोग्याचा व मानसिकतेचा विचार करून शाळा सकाळ सत्रात भरून ११.३० पर्यंत सोडल्या जाव्यात.
- रवींद्र जाधव, पालक-भिवंडी
परीक्षा घेतल्यानंतरच सुटी शासनाने जारी केलेल्या अध्यादेशात बदल करून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शाळांना त्यांच्या परीक्षा वेळेत घेऊन सुटी घेण्यास सांगितले आहे; पण अभ्यासक्रम पूर्ण न केलेल्या शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करूनच परीक्षा घेतल्यानंतर सुटी घेण्याचे सूचित केलेले आहे.
- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी