रेल्वे प्रवाशांना रखडपट्टीची मगर‘मिठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:36 AM2019-08-04T00:36:38+5:302019-08-04T00:36:56+5:30
डोंबिवली ते ठाणे तीन तास, रेल्वेरूळावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, प्रवाशांच्या नशिबी पायपीट
ठाणे : मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकापाशी मिठी नदीला पूर आल्याने रेल्वेरुळांवर तुफान पाणी साचल्याने तसेच त्याचवेळी समुद्राला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती आल्याने रेल्वे वाहतूक पार धुऊन गेल्याचा मोठा फटका ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरांत राहणाऱ्या लक्षावधी प्रवाशांना शनिवारी बसला. सकाळी तुफान पावसात रडतखडत कार्यालय गाठलेल्या चाकरमान्यांची अतिमुसळधार पावसामुळे कार्यालये सोडून दिल्याने सुटका झाली. मात्र, उपनगरांत वास्तव्य करणारे हे प्रवासी रखडपट्टीच्या मगरमिठीत सापडले.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ठाणे व मुंबई परिसरांत तुफान वृष्टी सुरू होती. शनिवार असल्याने आणि पावसामुळे काहींनी घरीच राहण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेगाड्यांना तुलनेने कमी गर्दी होती. सकाळी सुमारे अर्धा तास उशिराने धावणाºया लोकलने चाकरमान्यांनी कसेबसे कार्यालय गाठले. दुपारी १२ नंतर साधारण तासभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ४.९० मीटरची यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती असल्याने अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना त्याचवेळी घरी सोडले. रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे रुळांवर पाणी साचले असतानाच भरतीमुळे मिठी नदीला पूर आल्याने उघडीप असतानाही कुर्ला येथे रेल्वेरुळांवरील पाणी कमी होणे दूरच, आणखी वाढले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप व डाउन मार्गावरील जलद व धीम्या मार्गावरील रेल्वेगाड्यांची वाहतूक कमालीची मंदावली. डोंबिवलीहून सुटलेल्या लोकलला ठाणे रेल्वेस्थानक गाठण्याकरिता अडीच ते तीन तास लागत होते. एकापाठोपाठ लोकलची रांग लागली होती आणि त्यामध्ये लक्षावधी प्रवासी अडकून पडले होते. घाटकोपर ते कल्याणदरम्यानची वाहतूक सुरू होती व त्यापुढे उपनगरीय गाड्या जाऊ शकत नव्हत्या. परिणामी, अनेक चाकरमान्यांनी खासगी टॅक्सीद्वारे घाटकोपर, ठाणे स्थानक गाठून पुढील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील प्रवास करण्याचा मार्ग पत्करल्याने रस्त्यावरील वाहतूकही अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
कोसळधारांनी ठाणे झाले ‘तलावांचे शहर’
ठाणे शहरात शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने व विशेषकरून केवळ दोन तासांत झालेल्या १०० मिमी पावसामुळे शनिवारी ठाण्यात ३९ ठिकाणी गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचून ठाणे हे ‘तलावांचे शहर’ बनले. तब्बल २०० घरांत पाणी घुसले तर श्रीरंग सोसायटी व वृंदावन सोसायटी या लब्धप्रतिष्ठितांच्या परिसरात पुरात अडकलेल्या ७० जणांना बोटीतून बाहेर काढावे लागले. घोडबंदर रोड या अतिश्रीमंतांच्या परिसरात असलेल्या नाल्यांनी तेथील टॉवरमध्ये घुसखोरी करून तेथील महागड्या मोटारींच्या होड्या केल्या आणि या टॉवरच्या सभोवती असलेल्या हिरवळ, जिम, रिक्रिएशन सेंटरमध्ये चिखल व घाणीचे साम्राज्य पसरवले. महापालिकेने शाळांना सुटी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा लाभला. मात्र, ठाण्यात दूरवर वास्तव्य करणाºयांचा आधार असलेली टीएमटीची सेवा साफ कोलमडली. शहरात धावणाºया लो फ्लोअर बसगाड्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने प्रवाशांना सीटवर मांडी ठोकून बसावे लागले आणि त्याचे व्हिडीओ वाºयाच्या वेगाने शेअर झाले. ठाण्यात बिल्डरांनी केलेली बेकायदा बांधकामे, अनधिकृत भराव, नाले बुजवण्याचे प्रकार याची पोलखोल कोसळधारांनी केली.
मुंब्य्रात पडझडीमुळे २३ सदनिका सील
मुंब्रा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंब्य्रात शुक्र वारी रात्रीपासून सुरू असलेल्या पडझडीमध्ये रशीद कम्पाउंड परिसरातील बी-२ या श्रेणीतील अलहक या इमारतीच्या तिसºया माळ्यावरील एका रूमच्या स्लॅबचा काही भाग शुक्र वारी रात्री कोसळला. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महापालिकेने या इमारतीमधील २३ सदनिका तसेच सहा दुकाने सील केली. दुसºया घटनेत आनंद कोळीवाडा परिसरातील एका बेकरीची चिमणी शनिवारी सकाळी कोसळल्यामुळे तिचा ढिगारा अंगावर पडून इकरार चौधरी हा तरु ण जखमी झाला. तिसºया घटनेत ठाकूरपाडा परिसरातील हनुमाननगर येथील एका घराची भिंत कोसळली. मात्र, सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.
कल्याण तालुक्यातील २२ गावांचा संपर्क तुटला
कल्याण / डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात ठिकठिकाणी सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले. भरतीच्या वेळी खाडीलगतच्या परिसरात पाणी वाढल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कल्याणमध्ये ‘क’ प्रभागातील चौधरी मोहल्ला येथील धोकादायक बनलेले एक घर पडले. परंतु, त्यात कोणतीही हानी झाली नाही. तसेच बाधित कचोरे येथील काही घरांवर शुक्रवारी रात्री दरड कोसळली असून, तेथील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
जे प्रभागातील अतिधोकादायक असलेल्या ‘समाधान’ या इमारतीचा काही भाग शुक्रवारी कोसळला. त्यामुळे त्यातील पाच कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. दुसरीकडे कल्याण तालुक्यातील २२ गावांचा संपर्क तुटला. आठवड्यात तिसºयांदा कल्याण-मुरबाड महामार्ग पाण्याखाली गेला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.
या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल शनिवारी सकाळी सहाव्यांदा पाण्याखाली गेला. तसेच येथील वासुंद्री गावाजवळील पुलालाही पाणी लागले
असून तोही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगरात पाणीच पाणी
भिवंडी तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरे आणि दुकानांत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोलमडली होती. तर, मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती.
कामवारी नदी दुथडी वाहत असताना नझराना-खाडीपार रोडवर बांधलेल्या नवीन पुलाच्या लोखंडी सांगाड्यामध्ये अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले. तर, वज्रेश्वरीजवळ तानसा नदीचे पाणी शिरून अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच केळठण पूल पाण्याखाली गेल्याने सात-आठ गावांचा संपर्क तुटला होता. अनगाव येथे घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले.
बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली आहे. रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पात्रातील पाणी पुन्हा शहराच्या दिशेने येत होते. दुपारी १२ वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना या पाण्याचा धोका निर्माण झाला नाही.
मात्र, नागरिकांनी पुराच्या पाण्याचा धसका घेतला होता. मीरा-भार्इंदर येथेही काही भागात भरतीचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दक्षता म्हणून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसामुळे मोठी कोंडी निर्माण झाली होती.
जोरदार पावसामुळे वालधुनी नदीला पूर येऊ न उल्हासनगरमध्ये शेकडो घरांत पुराचे पाणी घुसले. तर, तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शहापूर-किन्हवली-मुरबाड मार्गावरील कांबारे व सापगावजवळील पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प होऊ न १५० हून अधिक गावांचा शहापूर शहराशी संपर्कतुटला होता. तर, अल्याणी गावात एका घराची भिंत कोसळली.