श्रावणात उपवासाच्या पदार्थांची रेलचेल; थाळीला खवय्यांची अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:13 AM2019-08-07T02:13:28+5:302019-08-07T02:14:15+5:30
साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरीचा समावेश
ठाणे : श्रावण सुरू झाला की, खवय्यांसाठी उपवासाच्या खमंग पदार्थांची रेलचेल उपहारगृह, हॉटेलमध्ये सुरू होते. एरवी उपवासाच्या दिवशीच मिळणारे हे पदार्थ श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर मिळत असल्याने खवय्ये या पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये यंदा ठाणेकर खवय्यांनी या थाळीला अधिक पसंती दिली आहे. त्याचबरोबर उपवासाचे थालीपीठ आणि बटाटापुरीही फॉर्ममध्ये आहे.
श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांसाठी खवय्ये खास उपहारगृहे किंवा मराठमोळी हॉटेल गाठतात. महिनाभर हे पदार्थ दररोज उपलब्ध असतील, असे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले. यात साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलाई मटका लस्सी, साबुदाणा खिचडी, वऱ्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ, मिसळ, कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल,भाजणी, थालीपीठ, कचोरी, साबुदाणा वडा, बटाटा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, खरवस, पुरी भाजी, इडली, स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पियुष तसेच, गोड पदार्थांमध्ये गुळाचा खरवस, दुधी हलवा यांसारखे विविध चवींचे, विविध प्रकारांचे पदार्थ श्रावण महिन्यात खास मेन्यू लिस्टमध्ये समाविष्ट केले जातात. उपवासाची थाळी यंदा खवय्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असल्याने त्याला अधिक मागणी आहे. यात पुरी बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, वरीच्या तांदळाचा भात, खीर, श्रीखंड या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ही थाळी १८० रुपये प्रमाणे मिळत आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ प्रत्यक्षात उपहारगृह किंवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी दुपारच्या वेळेस जास्त गर्दी असते, संध्याकाळच्या वेळेस पार्सल नेण्यावर खवय्यांचा भर असतो. गेल्यावर्षी उपवासाच्या पदार्थांचे दर वाढवले होते. यंदा दर स्थिरच ठेवण्यात आले असल्याचे जोशी यांनी सांगितले.
पार्सलमध्ये खिचडी, मिसळ, थालीपीठ, कचोरी हे पदार्थ नेण्यावर खवय्यांचा भर असतो. श्रावणात नेहमीच्या साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, बटाटा - रताळ्याचे काप या नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्ये दुपारच्या वेळेस उपवासाच्या थाळीला पसंती देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. उपहारगृहात दरवर्षी होणारी गर्दी यंदा १० ते १५ टक्क्यांनी ओसरली आहे. पाऊस कमी झाला की ही गर्दी वाढेल, अशी आशा उपहारगृह तसेच, हॉटेल मालक व्यक्त करीत आहेत.