चेन खेचण्याच्या प्रकाराने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:28 AM2019-05-13T00:28:07+5:302019-05-13T00:28:19+5:30
एलटीटीला जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या कल्याणनंतर थेट कुर्ला येथे थांबतात. त्यामुळे ठाण्यात उतरणा-या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर प्रवाशांकडून चेन खेचण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
- पंकज रोडेकर
ठाणे : एलटीटीला जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या कल्याणनंतर थेट कुर्ला येथे थांबतात. त्यामुळे ठाण्यात उतरणा-या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर प्रवाशांकडून चेन खेचण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. लोकलमध्ये चेन खेचण्याचे प्रकार एक्स्प्रेसच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के इतके आहे. मागील चार महिन्यात एक्स्प्रेस आणि लोकलध्ये जवळपास चेन खेचण्याचे १५० प्रकार घडल्याची नोंद रेल्वे प्रशासनाने केली आहे. रेल्वे पोलिसांनी चेन खेचणाºया ६२ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एक्स्प्रेसमध्ये १०१ वेळा चेन खेचण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे संबधित गाडीचे वेळापत्रकही कोलमडत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अप-डाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा लोकल धावतात. ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. यामुळे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. मात्र ठाण्यात सर्वच एक्स्प्रेसला थांबा मिळालेला नाही. ते दादर -कल्याण, कुर्ला-कल्याण असे असल्याने ठाण्यातून जाणाºया प्रवाशांना एकतर कल्याण किंवा कुर्ला-दादर येथे येजा करावी लागते. ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने खर्चिक आणि त्रासदायक आहे. त्यामुळे ज्या एक्स्प्रेस ठाण्यात थांबत नाहीत त्या गाड्यांमध्ये चेन खेचण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. चेन खेचल्यावर गाडी ४ ते ५ मिनीटे थांबते. तसेच चेन खेचणारा नेहमीच भेटतोच असेही नाही. काही वेळा सामान किंवा मुले मागे राहिल्यावर चेन खेचली जात असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. एक्स्प्रेससोबत लोकल गाड्यांमध्येही चेन खेचली जाते. विशेषत: दिव्यांग डबा आणि बºयाच वेळा लोकलमध्ये अस्वच्छता किंवा अन्य काही घटनांमुळे हे प्रकार घडतात. मध्यंतरी खोडकरपणे चेन खेचल्याप्रकरणी ठाणे आरपीएफने दोन घटनांमध्ये मुंब्य्रात कारवाई केली आहे. बºयाच वेळा चेन खेचणारे मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. त्यातच ठाणे हे व्यस्त स्थानक असल्याने चेन खेचणारे गर्दीचा फायदा घेऊन निघून जातात, अशी माहिती रेल्वे अधिकाºयाने दिली.
एक्स्प्रेसमध्ये चेन खेचल्यावर गाडी जागीच थांबते
एक्स्प्रेसमध्ये चेन खेचल्यावर गाडीला ब्रेक लागतात. याचदरम्यान, चेन खेचल्याने बाहेर येणारा लिव्हर जोपर्यंत कर्मचारी आत सरकवत नाही. तोपर्यंत एक्स्प्रेस गाडीचा अलार्म वाजत राहतो. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक होते.
लोकलमध्ये चेन खेचल्यावर गाडी फ लाटावर येऊन थांबते
लोकलमध्ये चेन खेचल्यावर मोटारमन आणि गार्ड हे हॉर्न वाजवत येतात. गाडी रेल्वे स्थानकातील फलाटावर येऊनच थांबते. लोकलमध्येही जोपर्यंत लिव्हर आत सरकवत नाही तोपर्यंत ही गाडी स्थानकातून पुढे जात नाही.