ठाण्यातील जिमला आग लावणा-या प्रशिक्षकाला अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:11 PM2019-10-05T22:11:23+5:302019-10-05T22:16:44+5:30

घोडबंदर रोडवरील एका जिमला आग लावून सुमारे ३० लाखांचे नुकसान करणा-या त्याच जिमचा माजी प्रशिक्षक योगेश भोईर याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवडयांपासून सीसीटीव्ही तसेच अन्य तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली.

Trainer arrested for setting fire to a gym in Thane | ठाण्यातील जिमला आग लावणा-या प्रशिक्षकाला अखेर अटक

कासारवडवली पोलिसांनी लावला छडा

Next
ठळक मुद्देकामावरून काढल्याच्या रागातून केले कृत्य३० लाखांचे झाले होते नुकसानकासारवडवली पोलिसांनी लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका जिमला आग लावून सुमारे ३० लाखांच्या सामग्रीचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच जिमचा माजी प्रशिक्षक योगेश राजेश भोईर (रा. गावदेवी रोड, ओवळा, घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. कामावरून काढल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील ‘ट्रॉपिकल लगून’ या इमारतीच्या गाळा क्रमांक १२ मधील बंद असलेल्या ‘अपोलो जिम’चे लॉक तोडून आग लावल्याचा प्रकार १४ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ११ ते १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या जिममध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शिरकाव करून जिममधील यंत्रसामग्री तसेच साहित्य जाळून ३० लाखांचे नुकसान केले होते. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जिममधील सीसीटीव्ही, डीव्हीआर काढून चोरी केली होती. याप्रकरणी जिमचे मालक प्रवीण म्हात्रे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून जिममधील काही माजी कर्मचाऱ्यांवरही संशय व्यक्त केला होता. या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसताना तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून जिमचा पूर्वाश्रमीचा प्रशिक्षक भोईर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर संशय बळावल्यानंतर त्याच्या संपूर्ण हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यातच त्याने अटकपूर्व जामिनाचीही तयारी केली होती. तो अनियमित असल्यामुळे जिमच्या चालकांनी त्याला दीड महिन्यापूर्वीच कमी केले होते. परंतु, पुन्हा कामावर घेण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. तरीही, त्याला कामावर घेण्यात न आल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली. पोलिसांना जिमचालकाने संशयितांची जी पाच ते सहा नावे दिली होती, त्यांच्यापैकीच योगेशचेही एक नाव होते. अलीकडेच मनसेच्या शारीरिक विभागानेही संशयितांमध्ये माजी कर्मचा-यांची नावे गोवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली होती. परंतु, पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अखेर आरोपीचा शोध घेतल्यामुळे जिमचालकांनी तपास पथकाचे आभार मानले. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, निरीक्षक खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव आणि महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली रत्ने आदींच्या पथकाने या प्रकरणाचा कौशल्याने तपास केला.

Web Title: Trainer arrested for setting fire to a gym in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.