शिलाँगमध्ये प्रशिक्षण तर दुबईत कंपनी

By admin | Published: April 11, 2017 12:57 AM2017-04-11T00:57:06+5:302017-04-11T00:57:06+5:30

कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल असलेल्या सागर उर्फ शॅगी ठक्कर याने शिलाँग (मेघालय) येथे एक प्रशिक्षण

Training in Shillong is the company in Dubai | शिलाँगमध्ये प्रशिक्षण तर दुबईत कंपनी

शिलाँगमध्ये प्रशिक्षण तर दुबईत कंपनी

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे

कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल असलेल्या सागर उर्फ शॅगी ठक्कर याने शिलाँग (मेघालय) येथे एक प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते तर दुबईत ‘फिनिक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी स्थापन केली होती. याच माध्यमातून त्याने अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
शॅगीसह त्याच्या साथीदारांनी ठाणे जिल्हयातील काशीमीरा येथील ‘डेल्टा’ इमारतीमधील कॉल सेंटरमधून १४ कोटींची तर नयानगर येथील एमबाले हाऊसमधील हैदरअली याच्या कॉलसेंटरमधून १९ कोटींची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. किमान ५०० पेक्षा अधिक अमेरिकन नागरिक शॅगी व त्याच्या सहकाऱ्यांच्या जाळ््यात अडकल्याचे समजते. आतापर्यत केवळ १२ अमेरिकन नागरिकांच्या आवाजावरुन त्यांची ओळख पडताळण्यात आली आहे. त्यामुळेच ठाणे पोलिसांनी ‘लेटर आॅफ रोगॅटरी’द्वारे ठाणे न्यायालयामार्फत अमेरिकन न्यायालयाला विनंती पत्र पाठवून फसवणूक झालेल्या १२ नागरिकांचे जबाब अमेरिकन पोलिसांकडून मागविले आहेत. हे जबाब मिळाल्यानंतर ठाणे पोलीस व अमेरिकन पोलिसांमध्ये माहितीची देवाण-घेवाण केली जाणार असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे पोलिसांच्या छाप्यानंतर मीरा रोड, अहमदाबाद, हैदराबाद,गुडगाव आदी ठिकाणचे ९० टक्के कॉल सेंटर बंद झाल्याची माहिती शॅगीने दिली.

वेगवेगळ््या क्षेत्रातील ज्ञान अफाट
- अवघ्या २४ वर्षीय शॅगीचे वेगवेगळया क्षेत्रातील ज्ञान अफाट असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. त्याने दुबईत ‘फिनिक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनीही सुरु केली होती. दुबईव्यतिरिक्त थायलंड येथेही तो १० दिवसांसाठी गेला होता. तेथून तो पुन्हा दुबईत आला.
याचदरम्यान, भारतात त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र तो अचानक भारतात परतला आणि पोलिसांच्या जाळ््यात सापडला. त्याच्याकडून प्रवासाची कागदपत्रे, दुबईचे चलन आणि दोन मोबाइलही जप्त करण्यात आले.

करोडोंची फसवणूक, पण नोंदीच नाहीत
मीरा रोडच्या डेल्टा इमारतीमध्ये सहा मजल्यांवर कॉल सेंटरचा पसारा सुरु होता. एकाच इमारतीमधून दोन ते तीन कोटींची उलाढाल व्हायची. पण याबाबतच्या कुठेही अधिकृत नोंदी नसल्याने पुरावे गोळा करतांना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

शॅगीला नोटबंदीचाही फटका
नोटबंदीचा मोठा फटका शॅगीलाही बसला. त्याला अहमदाबादचे एक घर विकावे लागले. जमीन खरेदीत त्याने मोठी गुंतवणूक केली आहे. ती कुठे आणि किती प्रमाणात आहे, त्याचीही चौकशी सुरु आहे.
शिलाँगच्या आमदार पुत्राचाही समावेश?
शॅगीने शिलाँगमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून त्यासाठी तेथील एका स्थानिक आमदार पुत्राचीही त्याने मदत घेतल्याचे समजते. अर्थात, तपासात अडथळा येऊ नये यासाठी या आमदार पुत्राबाबतची माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली.

३९७ जणांना अटक
याप्रकरणी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल असून आतापर्यंत ३९७ जणांना अटक झाल. शॅगीच्या मदतीने मीरा रोडमधील कॉलसेंटर चालविणारा तफेश गुप्ताला लवकरच अटक होईल. शॅगीची बहिण रिमा ठक्कर हिच्यासह १५ जणांचा अजूनही शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Training in Shillong is the company in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.