देशभरात गाड्या धावताहेत, पण राज्यात अजूनही पॅसेंजर ट्रेनचे रेल्वेला वावडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:23+5:302021-07-16T04:27:23+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी सर्व पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी सर्व पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दक्षिणेला, उत्तरेला जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असली तरीही सामान्यांना परवडणारी आणि इच्छित रेल्वेस्थानकात थांबणारी पॅसेंजर तातडीने सुरू करावी, अशी मागणी सामान्य, ज्येष्ठ नागरिक प्रवासी करू लागले आहेत. विशेष ट्रेन सोडण्यात येत असल्या तरीही त्याचे अव्वाच्या सव्वा भाडे न परवडणारे असून त्या गाड्या सगळ्या स्थानकात थांबत नाहीत. पुन्हा त्यातून जायचे म्हटले तर दोन टप्प्यात प्रवास करावा लागत असून त्यामुळे वेळ जातो, पैसाही जास्त खर्च होतो. त्यामुळे तातडीने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
-----------------------
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
अ. दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या फुल्ल आहेत
ब. उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेटिंग, आरएसी मिळते
क. राज्यातील लांबपल्ल्याच्या गाड्या सर्वत्र थांबत नाहीत
ड. या गाड्यांपेक्षा पॅसेंजरचे तिकीट कमी, परवडणारे असते
-----------------
२) सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
अ. हैदराबाद मार्गावरील गाड्या
ब. दिल्ली मार्गावरील गाड्या
क. कोकणात सिंधुदुर्ग, मालवणपर्यंत जाणाऱ्या गाड्या
ड. मद्रास, अलाहाबाद, लखनौ मार्गावरच्या गाड्या
-------------------
मग पॅसेंजर बंद का? गाड्यांची नावे
एलटीटी-पंढरपूर पॅसेंजर
मुंबई-भुसावळ पॅसेंजर
दादर-रत्नागिरी
दिवा-सावंतवाडी
एलटीटी-साईनगर शिर्डी
मनमाड-इगतपुरी शटल
------------------
रेल्वे आणि राज्य शासन यांच्या समन्वयातून सध्या कोविड काळात गाड्या सोडण्यात येत आहेत. मध्यंतरी शिर्डीसह अन्य एका मार्गावर पॅसेंजर गाडी सोडण्यात आली होती. मात्र त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे प्रशासनाला त्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यादेखील सोडण्यात येतील असेही सांगण्यात आले.