मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली
By धीरज परब | Published: July 9, 2023 07:42 PM2023-07-09T19:42:48+5:302023-07-09T19:43:00+5:30
मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे. आमदार ताईंची थप्पड खाणाऱ्यासह सहकारी कनिष्ठ अभियंत्यांचा देखील बादलीत समावेश आहे. अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई न होणे, विशिष्ट अर्थपूर्ण तक्रारींवर कारवाई करणे आदी आरोप होत असल्याने प्रभाग अधिकारी आणि ठेक्याच्या कनिष्ठ अभियंते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. थप्पड कांड वरून मोठा वाद निर्माण झाल्या नंतर प्रशासनाने ठेक्याच्या कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली केली.
महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात काशीमीरा व मीरारोड परिसर प्रभाग समिती ६ मध्ये असलेले शुभम पाटील यांना मीरारोड प्रभाग समिती ५ मध्ये तर संजय सोनी यांना भाईंदर पश्चिम प्रभाग समिती २ मध्ये नियुक्त केले आहे. बिल्डरच्या तक्रारी वरून पावसाळ्यात शासन आदेश न जुमानता राहते घर तोडल्या प्रकरणी आमदार गीता जैन यांनी शुभम यांच्या थप्पड लगावली होती. शुभम व सोनी यांनी आ. जैन यांची तर आ. जैन व घर तुटलेल्या महिलेने त्या दोन्ही कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार पोलिसात केली होती. नंतर दोघां मधील वाद मिटला व कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार मागे घेतली होती.
पाणी पुरवठा विभागातुन प्रज्वल पाटील यांची सार्वजनिक बांधकाम विभागात, अजित पेंढारे यांची प्रभाग समिती ६ तर पिनाक लोनुष्टे यांची प्रभाग समिती ४ च्या अतिक्रमण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे . प्रभाग समिती ४ मधून दुर्गादास अहिरे यांची प्रभाग समिती ५ तर विकास शेळके यांची प्रभाग समिती २ मध्ये नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती ५ मधील वैभव पेडवी यांची प्रभाग समिती ६ मध्ये तर प्रभाग समिती २ मधील चंचल ठाकरे यांची प्रभाग समिती ४ मध्ये बदली करण्यात आली.