खाबूगिरी प्रकरणांनंतर केडीएमसीत बदल्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:38+5:302021-03-20T04:40:38+5:30

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग ...

Transfer sessions with KDM continue after Khabugiri cases | खाबूगिरी प्रकरणांनंतर केडीएमसीत बदल्यांचे सत्र सुरूच

खाबूगिरी प्रकरणांनंतर केडीएमसीत बदल्यांचे सत्र सुरूच

Next

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील २२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. त्यात कंत्राटी कामगार, वाहनचालक, सफाई कामगार, कामगार, शिपाई आदींचा समावेश आहे.

नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी भांगरे आणि मढवी यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. यात त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले होते. मनपात आतापर्यंत झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये बहुतांश अधिकारी हे प्रभाग अधिकारी आहेत. काही प्रकरणांमध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह त्यांचे कर्मचारीही पकडले गेले आहेत. सोमवारी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. त्यानंतर आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या ही बदल्या केल्या आहेत. त्यांच्याही प्रभागांतर्गत बदल्या केल्या आहेत. ई, फ, ब, ग, ह, अ, क, आय, ड, जे या सर्वच्या सर्व दहा प्रभागांमधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अदल्याबदल्यानंतर तरी खाबूगिरीच्या प्रकरणांना आळा बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-----------------

मनपा मुख्यालयाच्या चढले पायऱ्या

- प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार सूर्यवंशी हे सहायक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवतील, अशी अपेक्षा होती; परंतु सहायक आयुक्त अक्षय गुडधे वगळता प्रभागांमध्ये अदलाबदली झालेले सर्वच अधिकारी हे मूळचे वरिष्ठ लिपिक आणि उपलेखापाल आहेत.

- त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये २२१ जण असले तरी काही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या काही कामगारांना मात्र अभय दिल्याने कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्याही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आपली बदली अन्य प्रभागांमध्ये होऊ नये म्हणून काहींनी गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या पायऱ्याही चढल्याची सूत्रांची माहिती आहे.

---------------------------

Web Title: Transfer sessions with KDM continue after Khabugiri cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.