आचारसंहिता लागण्यापूर्वी ठामपा आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करा, निवडणूक आयोगाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:37 PM2019-09-12T19:37:46+5:302019-09-12T19:39:26+5:30
सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये
ठाणे : सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये, अन्यथा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचे स्थानिक हितसंबंध तयार होतात, विशेषतः निवडणुकांच्या वेळी या हितसंबंधांचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकीच्या आधी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून दिले जातात, लोकशाही तत्वप्रमाणे ही एक योग्य परंपरा प्रत्येक निवडणुकीत पाळली जाते.
ठाणे महापालिकेत मात्र संजीव जैस्वाल हे साडे चार वर्षे त्यांच्या हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, महापौर व अनेक नगरसेवक याबाबतीत वारंवार निषेध करीत आहेत, असे असतानाही, खूप तक्रारी असूनही, केवळ पालक मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांची बदली केली जात नाही आणि आता राज्यात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातलेल्या असताना त्यांची बदली करणे हे अत्यावश्यक बनले आहे, असे निदर्शनास आणून आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करावी अशी मागणी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून करण्यात आली आहे, कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे यांनी असे पत्र लिहिले आहे.
सरकारी मार्गदर्शक तत्वे व नियमाला अनुसरून तशी बदली करणे आवश्यक बाब आहे, अशी बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला द्यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली असून या पत्राची प्रत राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील पाठविण्यात आली आहे.
अशा प्रकारे बदली न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका सादर करून हा प्रश्न धसास लावण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन उन्मेष बागवे यांनी केले असून वेळ पडल्यास शिवसेना-भाजप वगळून अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक अधिसूचना लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता असताना घटनात्मक पेचप्रसंग उभा राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली