टाउन हॉलचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:54 AM2020-06-04T00:54:56+5:302020-06-04T00:55:06+5:30
नेत्यांनी केली मागणी : रुग्णसंख्या ४०० च्या वर गेल्याने उल्हासनगर शहर ठरतेय हॉटस्पॉट
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या वर गेल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने टाउन हॉल आणि जलतरण इमारतीचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. सोमवारी सुरु झालेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या पुढे गेली असून संसर्ग रुग्णाची वाढती संख्या बघता रुग्णांना बेड कमी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून रुग्णांची संख्या मंगळवारी ४०० च्या वर गेली. संसर्ग रुग्णाची अशीच संख्या वाढत राहिल्यास महापालिकेला कोरोना रुग्णालयासाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. डॉ. आंबेडकर अभ्यासिकेचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले असून १०० ऐवजी १५० बेड येथे ठेवण्यात येणार
आहे.
तसेच शेजारील आयटीआय कॉलेजमध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्याचे काम पालिकेने सुरू केले. कॅम्प नं -४ व ३ येथील कोरोना रुग्णालयातील बेडची क्षमता ५० ऐवजी ७५ केली असून प्रत्यक्षात ८० पेक्षा जास्त रुग्ण ठेवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी
दिली.
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची वाढती संख्या बघून व त्यांना वेळेत व चांगले उपचार मिळण्यासाठी रुग्णालयासाठी जागा शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. नेत्यांनी महापालिकेच्या टाऊन हॉल व तरणतलाव येथील इमारतीचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे लावून धरली आहे.
तसेच त्याठिकाणी संशयित कोरोना रुग्णांना क्वारंटाइन करण्याचेही सुचविले आहे. दोन्ही इमारती चांगल्या अवस्थेत असून मुख्य रस्त्याला लागून असल्याने कोणतीही समस्या निर्माण होणार नसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
बदलापुरात एकाच दिवशी २९ रुग्ण
बदलापूर : शहरात बुधवारी कोरोनाचे नवीन २९ रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमधील २२ रुग्ण हे बाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तर दोघांना संसर्ग कसा झाला हे समजू शकलेले नाही. उर्वरित पाच रुग्णांमध्ये एक वैद्यकीय कर्मचारी, प्रिंटिंग प्रेसमधील एक कर्मचारी, मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आणि दोन जण लॅब टेक्निशियन आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या २६१ इतकी झाली आहे. दुसरीकडे १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १२४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पालिकेस बुधवारी ५२ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २९ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
भिवंडीत १९ नवे रु ग्ण
भिवंडी : भिवंडी शहरात १२ तर ग्रामीण भागात सात कोरोना रुग्ण बुधवारी आढळले. ग्रामीण भागात खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोन, दिवा अंजुर येथे चार तर अनगाव येथे एक रुग्ण सापडला.
क्वारंटाइन सेंटर दीड तास अंधारात
ठाणे : पावसामुळे भार्इंदरपाड्यातील क्वारंटाइन सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळीही वीज गेल्याने रुग्णांना दीड तास अंधारात काढावा लागला.