कल्याण-डोंबिवलीमध्ये आजपासून कायापालट मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:18 AM2020-02-27T00:18:52+5:302020-02-27T00:19:02+5:30
आयुक्त होणार सहभागी; खडकपाडा सर्कल येथे प्रारंभ
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कायापालट मोहीम राबविली जाणार असून, त्याचा शुभारंभ गुरुवारी खडकपाडा सर्कल व बिर्ला कॉलेज परिसरात केला जाणार आहे. या मोहिमेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. स्वच्छ व सुंदर कल्याण-डोंबिवली, यावर या मोहिमेचा अधिक भर राहणार आहे.
खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलदरम्यान रस्त्याची स्वच्छता करणे, दुभाजकाची रंगरंगोटी करणे, पदपथ रंगविणे ही कामे गुरुवारी केली जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने, यासाठी खास तयारी केली असून, नवीन झाडे मागवली आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी दिली.
स्वच्छ, सुंदर कल्याण-डोंबिवली या उपक्रमाचा शुभारंभ २०१२ मध्ये तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर असताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी ठाकुर्लीनजीक कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, गणेश मंदिरानजीक सेल्फी पाइंट विकसित करण्यात आला होता. तसेच प्रत्येक प्रभागात स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवली हे अभियान राबविले जाईल, असे सांगण्यात आले होते. मोठ्या जोशात सुरू झालेली मोहीम सुरुवातीला काही प्रभागांत राबविली गेली. मात्र, त्यानंतर उत्साह ओसरला.
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी अलीकडेच केडीएमसीत घेतलेल्या बैठकीत या मोहिमेचा पुनरुच्चार केला. तसेच त्यांच्या या मोहिमेचे पुढे काय झाले, याबाबत विचारणा केली. मोहीम थंडावली असेल तर, ती पुन्हा सुरू करून शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर द्या, याकडे लक्ष वेधले. त्यानुसार प्रत्येक प्रभागात कायापालट मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रस्त्यांसाठी प्रस्ताव तयार
मुख्यमंत्र्यांनी रस्ते, स्वच्छता आणि शहर सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्याचा प्रस्ताव तयार करून महापालिकेने तो राज्य सरकारला पाठवावा, असेही सूचित केले होते. तो प्रस्ताव शहर अभियंत्यांनी तयार केला आहे. त्यामुळे कल्याण व डोंबिवलीतील प्रत्येकी ५० कोटींचे रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, स्वच्छता व सुशोभीकरणासाठी काय सुचविले आहे, हे प्रस्तावात स्पष्ट झालेले नाही.