ट्रान्सफॉर्मर चोरणारी दुक्कल अटकेत
By admin | Published: May 6, 2017 05:50 AM2017-05-06T05:50:18+5:302017-05-06T05:50:18+5:30
शहापूर आणि भिवंडी या ग्रामीण भागांत ट्रान्सफॉर्मर चोरून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या एका दुकलीच्या मुसक्या ठाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी या ग्रामीण भागांत ट्रान्सफॉर्मर चोरून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या एका दुकलीच्या मुसक्या ठाणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. तर, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्याने महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केल्याने त्या दोघांना हाताशी घेऊन चोरीचे सत्र सुरू केल्याचे तपासात पुढे आले आहे. या दुकलीने शहापूर आणि पडघा परिसरांत ९ ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहापूर व भिवंडी उपविभागांमध्ये ट्रान्सफॉर्मरचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. चोरीच्या घटनेनंतर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यापर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याचदरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी अशा गुन्ह्यांना वेळीच आळा बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या शहापूर युनिटने मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गोरखणे, रा. अघई आणि निलेश मलावकर, रा. कोशिंबिळे, शहापूर या दोघांना अटक केली. चौकशीत या गुन्ह्यांची कबुली देताना ट्रान्सफॉर्मर चोरण्यास फेब्रुवारी २०१७ पासून सुरुवात केली होती. यामधून तांबे मिळवण्यासाठी त्यातील वायर नदीकिनारी जाळत असत. तसेच ते दोघे कमी शिकले असून सध्या बेकार होते. त्यातच मुख्य आरोपीने काही महिन्यांपूर्वी महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केल्याने त्याला काही ज्ञान होते. त्याने या दोघांना मदतीला घेऊन चोरी करण्यास सुरुवात केली. ही कामगिरी आंधळे यांच्या पथकाने पार पाडली.
सतीश आणि निलेश यांच्या तीन मोटारसायकली, ट्रान्सफॉर्मर खोलण्यासाठीचे साहित्य आणि ३६५ किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा असा एकूण ४ लाख ३५ हजार ३१० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. चोरी केलेल्या तांब्याची तार विकण्याच्या तयारीत ते होते. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली.