वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:56 AM2020-01-16T00:56:05+5:302020-01-16T00:56:42+5:30

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

Transit Railways reduce freight rates | वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

वाहतूककोंडीवर रेल्वेसह जलवाहतुकीचा उतारा; रेल्वेने मालवाहतुकीचे दर केले कमी

Next

ठाणे : जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टमधून होणाऱ्या मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण यांच्यातील वाढीचा परिणाम ठाणे शहरातून येजा करणाºया ट्रक व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीवर होत आहे. यावर उपायासाठी केंद्र सरकारमधील रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य ही खाती एकत्र आली आहेत. त्यानुसार, आता मालाची वाहतूक ट्रकऐवजी रेल्वेतून करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

पूर्वी होणारा खर्च हा कमी केला असून त्याची अंमलबजावणी तीन ते चार महिन्यांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीअंशी कमी होईल, असा दावा त्यांनी केला. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात मालवाहतूक ही मुंबई-आग्रा तसेच मुंबई-अहमदाबाद या दोन महामार्गांवरून सुरू असते. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरात अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे शहरांमधील कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. ती सोडविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत एक नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वे, जहाजबांधणी-नौकानयन आणि वाणिज्य या तीन विभागांच्या माध्यमांतून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रेल्वेची टनामागे दोन हजार रु पयांची कपात
जेएनपीटी बंदरातील मालाची चढउतार करण्यासाठी हाताळणी शुल्क आकारले जाते. रेल्वेचे शुल्क महाग असल्यामुळे व्यापारी ट्रकवाहतुकीला पसंती देतात. रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, मालगाडीचे शुल्क ट्रक वाहतुकीपेक्षा टनामागे दोन हजार रु पयांनी कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रो-रो वाहतूकसेवेतील अडचणी दूर करणार
उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणारी अवजड वाहतुकीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांत कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मध्यंतरी २०१७ मध्ये वसई ते कोलाडपर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या कशा प्रकारे दूर करता येऊ शकतात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जलवाहतुकीसाठी मागविले देकार
जेएनपीटी बंदरात येणाºया मालाची साठवणूक भिवंडीतील गोदामांमध्ये करण्यात येते. त्यासाठी जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते तसेच भिवंडीच्या गोदामातून इतर ठिकाणीही अन्य वाहनांमार्फत वाहतूक सुरू असते. मात्र, नौकानयन विभागाने आता जेएनपीटी ते मुंबई पोर्ट ट्रस्ट या मार्गावर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देकार मागविले आहेत.

Web Title: Transit Railways reduce freight rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.