वाहतूककोंडीवर भुयारी मार्गाचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:48 AM2019-12-19T00:48:29+5:302019-12-19T00:48:36+5:30
तीनहात नाक्यावर आता एलिव्हेटेड रोटरी नाही : सल्लागारासाठी चार कोटी २३ लाखांचा खर्च
ठाणे : तीनहातनाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने विविध प्रयोग हाती घेतल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात तीनहातनाक्यावरील कोंडी फोडण्यासाठी येथे त्रिस्तरीय वाहतूक नियोजन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु, या ठिकाणी मेट्रोचा मार्ग येत असल्याने आणि तिकडे कोपरी पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने येथे एलिव्हेटेड रोटरीऐवजी सबवेचे (भुयारीमार्ग) काम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सुरुवातीला या कामासाठी २३९.३५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु, आता या ठिकाणी भुयारीमार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याने त्यासाठी नव्याने सल्लागार नेमला जाणार आहे. यासाठी चार कोटी २३ लाख ६४ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
या जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालिकेने एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून येथील वाहतूककोंडीचा सर्व्हे केला होता. आता पहिल्या टप्प्यात तीनहातनाका येथील वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी येथे त्रिस्तरीय (ग्रेड सेपरेटर) वाहतूक नियोजन केले जाणार आहे. या जंक्शनवर गर्दीच्या वेळी उड्डाणपुलावरील वाहतूक वगळून सुमारे २५ हजार वाहनांची वाहतूक होते. येथील वाहतूक सद्य:स्थितीत सिग्नलद्वारे नियंत्रित केली जात असून सिग्नलची वेळ २५० सेकंद इतकी मोठी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस २०० ते ३०० मीटर लांबीच्या रांगा येथे लागलेल्या असतात. त्यामुळे येथील उड्डाणपुलाची क्षमताही कमी पडत आहे. त्यामुळेच आता त्रिस्तरीय वाहतुकीचे नियोजन प्रस्तावित आहे. त्यानुसार, येथे अस्तित्वात असलेल्या वाहतूकव्यवस्थेत हा प्रयोग केला जाणार होता. दुसऱ्या स्तरात पुलाच्या बांधकामात सुधारणा, नाक्याच्या मध्यभागी रोटरी निर्माण करून गोखले रोड व लालबहादूर शास्त्री रस्त्याकडे वाहनांना जाण्यासाठी आर्म देणे आणि तृतीयस्तरात ठाण्याहून मुंबईकडे व मुंबईकडून ठाण्याकडे येणाºया वाहतुकीसाठी स्वतंत्र पूल तयार करणे प्रस्तावित होते.
याव्यतिरिक्त पादचाऱ्यांसाठी कॅडबरी जंक्शन व तीनहातनाका येथे भुयारीमार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, गोखले व खोपट रोडचे आवश्यक त्या प्रमाणात रुंदीकरण व सुधारणा, नितीन आणि कॅडबरी जंक्शनवर रॅम्पची सुविधा आदी महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश आहे. त्यानुसार, शहरांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यासाठी अस्तित्वातील उड्डाणपुलाच्या मुख्य जंक्शनवरील भागामध्ये एलिव्हेटेड रोटरी बांधून त्यास योग्य त्या रस्त्यावरून प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग देण्यात येणार होता. त्यानुसार, याचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरू झाले होते. यामध्ये एलबीएसमार्गावर मुलुंडकडून जमिनीपासून १५ मीटर उंचीवर एक उड्डाणपूल उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा उड्डाणपूल एका बाजूने गोखले रोड येथील व्होडाफोन गॅलरीकडे आणि दुसरी बाजू एलबीएस ते ठाणे एलबीएस म्हणजेच वनविभागाच्या कार्यालयाकडे खाली उतरणार आहे. एलबीएस मुलुंड ते एलबीएस ठाणे हा ४१० मीटर, एलबीएस मुलुंड ते गोखले रोड ३९० मीटर असे या उड्डाणपुलाचे स्वरूप राहणार होते. एलबीएस ठाणे आणि गोखले रोडकडे उतरणारी बाजू ही वनवे राहणार होती. काही वर्षांपूर्वी पालिकेने असे काहीसे स्वप्न ठाणेकरांना दाखविले होते. परंतु, आता पालिकेने हा पर्याय बासनात गुंडाळण्याचे निश्चित केले आहे.
पालिकेच्या महासभेत ठरणार प्रस्तावाचे भवितव्य
च्तीनहात नाक्यावर मेट्रो-४ चे काम हाती घेण्यात आले आहे. याच जंक्शनवरील इटर्निटी मॉलसमोर मेट्रो स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय, कोपरी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गाच्या उंचीमध्ये चार मीटरपर्यंत वाढ करण्याचेही काम सुरु आहे.
च्तीनहात नाक्यावर सुरु असलेल्या विविध कामांमुळे कोंडी होत असून, त्यामुळे पूर्वीचा पर्याय करणे शक्य नसल्याचा पालिकेने दावा केला आहे. त्यामुळे येथे भुयारीमार्गाचा किंवा इतर दुसºया कोणत्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो का, यासाठीचा अभ्यास केला जाणार आहे.
च्तीनहातनाका शहरातील सर्वाधिक वाहतुकीचे जंक्शन आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आता चार कोटी २३ लाख ६४ हजारांचा खर्च सल्लागारावर केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेच्या गुरुवारच्या महासभेत चर्चेला येणार आहे.