माळशेज घाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी बांधणार पारदर्शक स्काय वॉक, पहिल्या टप्प्यातील ५ कोटींचा प्रस्ताव सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:15 PM2018-01-21T20:15:53+5:302018-01-21T20:16:08+5:30
निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे.
ठाणे - निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच आमदार किसन कथोरे यांनी माळशेज घाटात अधिक पर्यटक यावेत तसेच याचे महत्व वाढावे यासाठी सुचना केली होती त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
माळशेज घाट सुप्रसिध्द असून उंच डोंगर, टेकडी तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर आहे. हा पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत आहे. येथे दुर्मिळ पशु- पक्षी आढळून येतात. घाटात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. विशेषत: पावसाळ्यात घाटाचे सौंदर्य बघण्यासारखे असते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत घाटात विविध ठिकाणी पार्किंग व व्ह्यु पॉईंटस् तयार करण्यात आलेले आहेत. या घाटाचे सौंदर्य विचारात घेता व पर्यटकांचा घाटात येण्याचा ओढा बघता या सुविधा कमी पडतात म्हणून पालकमंत्र्यांनी घाटातील महाराष्ट्र पर्यटन निवास शेजारील टेकडीवर जागतिक दर्जाचा स्काय वॉक बांधण्याची सुचना केली होती. त्याला अनुसरुन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून या जागेत काचेचा पारदर्शक स्कॉय वॉक बांधणे व Viewing Gallery साठी इमारत बांधणे व पर्यटकांच्या दृष्टीने सौंदर्यीकरण व बागकाम करणे ह्या कामांच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांना मान्यतेस्तव सादर केला आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच व्ह्यूइंग गैलरी असेल व यामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्यात निश्चित वाढ होवून पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी माहिती देतांना सांगितले.