श्वेतपत्रिका नव्हे, वस्तुस्थिती मांडणार परिवहन प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:43 AM2019-01-23T00:43:44+5:302019-01-23T00:43:52+5:30
बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती.
ठाणे : बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती. परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुध्दा यावेळी करण्यात आली आहे.
पुढील महासभेत श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे; मात्र श्वेतपत्रिका नव्हे, तर परिवहनची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहन आजही सक्षम असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे.
बेस्ट कामगारांनी ९ दिवस संप पुकारला होता. भविष्यात ठाणे परिवहन सेवेची अशीच अवस्था होऊ शकते. त्यामुळे परिवहनच्या कारभारावर राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि गटनेते हणमंत जगदाळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आक्षेप घेतला. जीसीसी कंत्राटावरच त्यांनी आक्षेप घेतला असून, चुकीच्या ठेक्यामुळे परिवहनचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.
आता १५० बसेस दुरुस्त करुन त्यासुध्दा जीसीसीवर चालविण्याचा घाट घातला जात असल्यावरही त्यांनी आक्षेप नोंदविला. जीसीसी पध्दतीने परिवहनचे रोजचे ९ लाखांचे नुकसान होत असून वर्षाकाठी हा तोटा तब्बल ३२ कोटींच्या घरात जात असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या स्पष्ट केले.
परिवहन सेवेमध्ये आस्थापनेवर केवळ २० ते ३० टक्के वाहन चालक काम करीत आहेत. परंतु परिवहन या सर्व कामगारांचा पगार काढत आहे. त्यामुळे आस्थापनेवर ७३ कोटी ८१ लाखांचा खर्च होत आहे. त्यात जीसीसीचा चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव तयार करण्यात आल्याने परिवहनला अंदाजे ५० कोटींच्यावर तोटा सहन करावा लागत असल्याचा मुद्दासुध्दा त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय इतरही मुद्दे उपस्थित करीत पुढील महासभेत परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.
परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१७ बसेस आहेत. दुरुस्तीअभावी १०० हून अधिक बसेस वागळे आणि कळवा आगारात उभ्या आहेत. यातील ४५ बसेसची दुरुस्तीची मोठी कामे शिल्लक असून उर्वरित बसेस या किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल, असे परिवहनचे मत आहे.
परिवहनच्या ताफ्यातील ३०० बसेसपैकी वागळे आणि कळवा आगारातून ८० बसेस बाहेर पडत असून, ३० पैकी २७ एसी व्होल्वो बसेस बाहेर पडत आहेत. जीसीसी तत्वावरील १९० पैकी १८० बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. परिवहनचे दिवसाचे उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.
जास्तीचे उत्पन्न मिळणार
परिवहनच्या ताफ्यातील १५० बसेसची दुरुस्ती करुन त्या जीसीसीवर चालविल्यास भविष्यातील दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. जास्तीचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावाही परिवहनने केला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहनचा कारभार आजही सुरळीत आहे. परिवहन सेवेत सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोणतीही सार्वजनिक सेवा केव्हाही फायद्यात नसते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठीच विविध उपाय केले जात असल्याचे मत परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवहनची जी वस्तुस्थिती आहे, तीच महासभेत मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.