परिवहन समिती निवडणुकीत भाजपला दगाफटक्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:49 AM2020-02-26T00:49:06+5:302020-02-26T00:49:14+5:30
२३ नगरसेवकांना बजावला व्हिप; पालन न केल्यास कारवाई
ठाणे : ठाणे परिवहन समितीमध्ये १२ सदस्य निवडून जाणार असले तरी त्यासाठी १४ जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात भाजपला एका जागेवर रोखण्यासाठी राष्टÑवादी आणि शिवसेनेची खलबते सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती असल्याने भाजपाच्या गटनेत्यांनी पक्षाच्या सर्व २३ नगरसेवकांना मंगळवारी व्हिप बजावला. निवडणूक होईपर्यंत सर्वांनी या व्हिपचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल,असेही त्यात स्पष्ट केले आहे.
राज्यात महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसनेदेखील यामध्ये उडी घेतली आहे. स्थायी समितीमध्ये शिवसेनेला साथ दिल्याने परिवहनमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील अधिकचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेची डोकेदुखी आधीच वाढली आहे. स्थायीची परतफेड करण्यासाठी काँग्रेसला साथ देणे शिवसेनेला क्रमप्राप्त झाले आहे.
शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आता त्यानुसार प्रत्येक निवडणुकीत या तीन पक्षांच्या सदस्यांना स्थान मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार काँग्रेसने आपला दावा मजबुत केला आहे.
आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसकडून भाजपला रोखण्यासाठी परिवहनमध्ये प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार भाजपने दोन अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे मत आपल्या उमेदवाराबरोबर राष्टÑवादीच्या उमेदवाराला मिळाले तर पक्षाचा एकच सदस्य परिवहनमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही निवडणूक गाजणार आहे.
निवडणुकीपर्यंत बाहेरगावी जाण्यास मनाई
एकीकडे शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली असतांना भाजपालाही आपले दोन सदस्य परिवहनमध्ये व्यवस्थितरित्या जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यानुसार या निवडणुकीच्या वेळेस सभागृहात पक्षाचा एकही नगरसेवक गैरहजर राहणे भाजपला झेपणारे नाही.
असे झाल्यास दोनपैकी एकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी मंगळवारी सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. त्यानुसार या निवडणुकीपर्यंत कोणीही न सांगता बाहेरगावी जाऊ नये, दिलेल्या सुचनांचे पालन व्हावे, तसेच जे उमेदवार दिले आहेत, त्यांनाच मतदान करावे असेही या व्हीपमध्ये सांगण्यात आले आहे.