भाजपसाठी परिवहन समितीचा पेपर कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:55 PM2020-02-11T23:55:17+5:302020-02-11T23:55:21+5:30
४ मार्चला होणार निवडणूक : महासभा निवडणार १२ सदस्य
ठाणे : दोन वर्षांपासून रखडलेली परिवहन समितीची निवडणूक येत्या ४ मार्च रोजी होणार असून १२ सदस्य हे निवडून जाणार आहेत. विशेष महासभा घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागविले जाणार आहेत. ज्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळतील, तेच परिवहन समितीमध्ये जाणार आहेत. पक्षीय बलानुसार भाजपचे दोन सदस्य जाणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपची काही गणिते बिघडल्यास त्यांचा एकच सदस्य येथे जाऊ शकणार आहे. त्यामुळे भाजपला सावध पावले टाकावी लागणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर पक्षीय बलाबलानुसार परिवहन समिती हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सत्ताधारी शिवसेनेने परिवहनची निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता दोन वर्षांनंतर शिल्लक राहिलेल्या ६ सदस्यांचा कार्यकाळही येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. परिवहन समितीवर एकूण १२ सदस्य निवडले जाणार आहे. त्यानुसार आता ४ मार्च रोजी ही निवडणूक होणार असून त्यासाठी आता पुढील आवड्यापासून उमेदवारी अर्ज मागिवले जाणार आहे.
महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचा होकार
राज्यात महाविकास आघाडी सरस झाल्याने आता ठाणे परिवहन समितीची निवडणूक घेण्यासाठी शिवसेनेने होकार दिल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस आता भाजपला रोखण्यासाठी परिवहनमध्ये प्रयत्न करणार आहे. विशेष महासभा लावून या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला १२ मते देण्याचा अधिकार असून ती कशी द्यायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. असे झाल्यास शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस अशा एकूण नगरसेवकांची संख्या धरली तर ती १०४ होत आहे. त्यामुळे त्यांचे सदस्य हे आपसुक परिवहनमध्ये जाणार आहेत.
भाजपला सावधानतेची गरज : दुसरीकडे भाजपचे अवघे २३ नगरसेवक आहेत. पक्षीय बलानुसार त्यांचे २ सदस्य परिवहनमध्ये जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार या दोन सदस्यांसाठी त्यांच्या प्रत्येक नगरसेवकाला मतदान करण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. एक किंवा दोन नगरसेवक गैरहजर राहिले तर निकाल बदल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे झाल्यास भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यताही आहे. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत सावधानतेने पावले उचलावी लागणार आहेत.