परिवहन समिती बरखास्तीच्या प्रस्तावामुळे बससेवा सुरू होण्याची आशा मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:48 AM2021-02-17T04:48:02+5:302021-02-17T04:48:02+5:30

उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने बससेवेविना केवळ दिखाऊ स्वरूपातील परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे भविष्यात बससेवा सुरू ...

The Transport Committee's dismissal proposal dashed hopes of resuming bus services | परिवहन समिती बरखास्तीच्या प्रस्तावामुळे बससेवा सुरू होण्याची आशा मालवली

परिवहन समिती बरखास्तीच्या प्रस्तावामुळे बससेवा सुरू होण्याची आशा मालवली

Next

उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने बससेवेविना केवळ दिखाऊ स्वरूपातील परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे भविष्यात बससेवा सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्याने, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिकेची बससेवा सुरू होत नसल्यास राज्य परिवहन महामंडळाने एसटी बससेवा सुरू करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे.

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर, त्यांनी खासगी ठेकेदारामार्फत धुमधडाक्यात महापालिका परिवहन बससेवा सुरू केली. मात्र अवघ्या साडेतीन वर्षांत तिकीट दरवाढीवरून महापालिका व ठेकेदार आमने-सामने उभे ठाकले. तिकीट दरवाढीस मंजुरी दिली नसल्याने, ठेकेदाराने बससेवा बंद केली. नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकदा महापालिकेने निविदा काढल्या. मात्र निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर बससेवेविना अस्तित्वात असलेली, परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आला. महापालिका परिवहनसेवा सुरू होण्याची आशा धूसर झाल्याने मनसेचे अध्यक्ष बंडू देशमुख यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे शहरात पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेची बससेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मंगळवारी शहरात राज्य महामंडळाची बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी कल्याण एसटी डेपोचे आगार व्यवस्थापक विजय गायकवाड व विठ्ठलवाडी डेपोच्या आगार व्यवस्थापक शेळके यांच्याकडे मनसेचे देशमुख यांनी केली. शहरात बससेवा सुरू झाल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे, शैलेश पांडव, ॲड अनिल जाधव, सुभाष हटकर, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख, संजय साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.........

परिवहन समिती बरखास्तीला विरोध

महापालिकेची बससेवा ठप्प असताना, परिवहन समिती बरखास्त करण्याची मागणी विविध संघटनेकडून केली गेली. अखेर महापालिका प्रशासनाने परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महासभेत आणला. मात्र सत्ताधारी व विरोधी पक्ष समिती बरखास्त करण्याच्या विरोधात आहेत.

.........

वाचली

Web Title: The Transport Committee's dismissal proposal dashed hopes of resuming bus services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.