महापौर, आमदारांमुळे ताटकळले परिवहनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:11 AM2019-08-28T00:11:22+5:302019-08-28T00:13:47+5:30

कल्याण आरटीओ कार्यालय भूमिपूजन : कार्यक्रमाकडे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची पाठ

Transport Minister stuck due to Mayor, MLAs | महापौर, आमदारांमुळे ताटकळले परिवहनमंत्री

महापौर, आमदारांमुळे ताटकळले परिवहनमंत्री

Next

कल्याण : राजकीय किंवा सरकारी कार्यक्रम असल्यास अनेकदा मंत्र्यांना उशीर झाल्यामुळे अनेकांना ताटकळत राहण्याची वेळ येते. उंबर्डे येथील कल्याणच्या आरटीओ कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मंगळवारी नेमके उलटे झाले. परिवहनमंत्री दिवाकर रावते या कार्यक्रमाला ११ वाजता वेळेत पोहचले; मात्र कल्याणचे आमदार नरेंद्र पवार आणि महापौर विनीता राणे तासभर उशिराने पोहचल्यामुळे रावते यांना प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, या कार्यक्रमाकडे भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यामुळे गर्दी नव्हती. अखेर येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनीच प्रेक्षकांची भूमिका बजावली.


कोकण वसाहतीनजीक असलेले कार्यालय आरटीओसाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे उंबर्डे येथील जागेत नवे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन परिवहनमंत्री रावते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केवळ महापौर राणे उपस्थित होत्या. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांच्यासह अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. शिवसेनेचा मंत्री येणार असल्यास कार्यकर्ते तेथे एकच गर्दी करतात. मात्र, रावते येणार असूनही शिवसैनिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. भाजप कार्यकर्तेही आले नव्हते; केवळ भाजपचे आमदार पवार यांनी उपस्थिती लावली. तेही एक तास उशिरा पोहोचले.


पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम जळवून आणल्याचा उल्लेख रावते यांनी भाषणात केला. एकदा मुख्यमंत्र्यांनी कल्याणच्या आमदाराकडे रावते यांची लक्ष नाही अशी विचारणा रावते यांच्याकडे केली होती. त्यावेळी रावते यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत. निधी देण्याची जबाबदारी अर्थ मंत्र्याकडे आहे असे स्पष्ट केले होते. हे रावते यांनी यावेळी आवर्जून सांगितले. एकीकडे शिवसैनिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असताना रावते यांनी त्यांच्या भाषणातून कल्याण हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सांगत असताना त्यांनी भाजप आमदार पवार यांच्याकडे नजर रोखली. त्यानंतर शिवसेना-भाजपची युती आहे, असा निर्वाळाही दिला. कार्यक्रमाला ठाणे रिजन टॅक्सी रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहत रावते यांनी सांगितले की, कल्याणमधून रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांच्या खूप तक्रारी आहेत. मात्र आपल्याच्या माणसांविरोधात असलेल्या तक्रारी आपण समजून घेत त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यावेळी रावते यांचा रोख पेणकर यांच्याकडे होता. पेणकर यांनी यावर केवळ हसणे पसंत केले.


रावते यांनी स्मार्ट सिटीचा उल्लेख मेगासिटी असा केला. तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्यात शिवसेना व भाजपची सत्ता असली तरी पाच वर्षांत हे पक्ष समरस झालेले नाहीत. त्यामुळे रावते यांना मुख्यमत्र्यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत फारसे कुतूहल नसल्याचेच या वक्तव्यातून सुचवायचे आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

इमारतीसाठी १३ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर
कल्याण आरटीओचे कार्यालय गुरुदेव हॉटेलजवळील इमारत कार्यरत होते. ते जुने झाल्यानंतर त्याचे स्थलांतर बिर्ला कॉलेजनजीकच्या कोकण वसाहतीजवळ २००० रोजी करण्यात आले. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आले. हे कार्यालयही अपुरे पडत आहे. त्यामुळे उंबर्डे-वाडेघर येथे ८,२२० चौरस मीटरच्या जागेत नव्याने कार्यालय उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन रावते यांच्या हस्ते पार पडले. नव्या कार्यालय इमारतीसाठी १३ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाले आहेत. परिवहन आयुक्तांनी नव्या इमारत बांधकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.

Web Title: Transport Minister stuck due to Mayor, MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.