‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:21 AM2019-08-03T00:21:31+5:302019-08-03T00:21:35+5:30
ग्रामीण रस्त्याची होणार चाळण : सदस्यांचा विरोध मावळला
ठाणे : मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठमोठ्या मशिनरी लागणार आहे. या मशिनरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून धावणार आहे. यामुळे रस्ते खराब होऊन ग्रामीण जनतेच्या समस्या वाढणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद काही सदस्यांनी यास विरोध केला होता. अखेर, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विरोध मावळल्यामुळे या रस्त्यांवरून मशिनरी वाहतुकीस मंजुरी मिळाली आहे.
या महामार्गाचे काम एका खाजगी कंपनीकडून होत आहे. यासाठी कंपनी मोठमोठ्या मशिनरी व वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. या वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण होऊन ते खराब होतील. याचा फटका ग्रामीण जनतेला बसणार असून विविध समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित गावकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीदेखील या रस्ते वापरण्याच्या परवानगीला विरोध दर्शवला होता. मात्र, तो आता मावळला असून संबंधित सदस्यांनी सहमतीने संमती दिल्यामुळे रस्ते वापरण्यास जिल्हा परिषदेने परवानगी मंजूर केली आहे.
डिपॉझिट न घेतल्याने नाराजी
या वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच डिपॉझिट करून घेण्याच्या मुद्यावरही बºयाच वेळा चर्चा झाली. पण, ठोस आश्वासनापूर्वीच रस्ते वापरण्याच्या परवानगीला मंजुरी दिल्याचे काही नाराज सदस्यांकडून सांगितले जात आहे. या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त आहे. ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमी गेला आहे. तर, शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमी जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, या रस्त्यांवरून वाहने सतत रात्रंदिवस येजा करणार आहेत.