वरसावे पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; पाण्याचे टँकरही मिळेनासे झालेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:42 PM2018-12-09T14:42:42+5:302018-12-09T14:43:08+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पूल बंद करून त्यावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पूल बंद करून त्यावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या वसई-विरार क्षेत्रातील बाजुकडे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने स्थानिक चाकरमानी, विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर, ठाणे येथील कार्यालयांसह शाळेत पोहोचण्यासाठी विलंबाचा फटका बसू लागला आहे. अशातच पाण्याचे टँकरही मिळेनासे झाल्याने परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) २००२ मध्ये वरसावे येथील घोडबंदर नदीवर बांधलेल्या वाहतूक पूलाच्या दोन स्प्रींग बदलण्यासाठी ७ डिसेंबरपासून पूलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. तसेच या पुलावरील दोन पैकी एक मार्गिकाच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवली आहे. त्याच्या लगत असलेल्या जुन्या पुलावरील मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू ठेवल्याने मीरा-भार्इंदर क्षेत्रातील वरसावे वाहतूक बेटावर वाहतूक कोंडीचा त्रास तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याउलट पुलाच्या दुसऱ्या टोकावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पुर्वीपेक्षा ती सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालजीपाड्यापर्यंत वाढली आहे. याचा सर्वात जास्त फटका तेथील स्थानिकांना बसू लागला आहे.
येथील चाकरमान्यांना मीरा-भार्इंदरसह ठाणे व मुंबई येथे नोकरीसाठी जावे लागते. तर विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर क्षेत्रातील शाळांत यावे लागते. येथील लोकांना मीरा-भार्इंदर शहर सोईचे ठरते. त्यामुळे येथील विद्यार्थी मीरा-भार्इंदरमधील शाळा व महाविद्यालयांत शिकण्यासाठी मोठ्याप्रमाणात येतात. तसेच येथील अनेक कुटूंबांना पाण्यासाठी नळजोडणी नसल्याने त्यांना वसई-विरार क्षेत्रातील मालजीपाडा तर मीरा-भार्इंदर येथील काशिमीरा परिसरातून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. मालजीपाडा येथून टँकर पोहोचण्यास किमान ४ ते ५ तास लागत असल्याने पुर्वी येणारे टँकर वाहतुक कोंडीमुळे येईनासे झाले आहेत. काशिमीरा येथून येणाऱ्या टँकरला येताना वाहतूक कोंडीचा फटका बसत नसला तरी परत जाताना मात्र वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे तेथील टँकरसुद्धा बंद करण्यात आल्याने येथे कृत्रिम पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येथील अनेकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने त्यांची वाहने मुंबई, ठाणे येथे पूलाच्या दुरुस्तीपुर्वी दररोज तीन ते चार फेऱ्या करीत होते. या कोंडीमुळे त्या वाहनांची एकच फेरी होत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे.
पुलाची दुरुस्ती लवकर पुर्ण करुन स्थानिकांना दिलासा द्यावा. तत्पुर्वी उद्भलेल्या वाहतूक कोंडीतून किमान स्थानिक विद्यार्थ्यांच्या बस तसेच पाण्याच्या टँकरला प्राधान्य दिले जावे. अनेक लोकं पुलावरुनच पायपीट करु लागले असुन रात्रीच्या वेळी पूलावर अंधार असल्याने त्यांच्या जीवीताला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूलावर पुरेशा उजेडाचे दिवे बसविले जावेत.
राजेंद्र ठाकूर, स्थानिक समाजसेवक
वसई-विरार क्षेत्रातील पूलाच्या बाजूकडील बहुतांशी विद्यार्थी आपल्या शाळेत येतात. त्यांना वाहतुक कोंडीमुळे विलंब होऊ लागला आहे. वाहतुक कोंडी सुसह्य होण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे सतत पाठपुरावा केला जात असुन त्यावर सकारात्मक कारवाई होत नाही.
केशव घरत, राजा शिवाजी विद्यालयाचे संस्थापक