परिवहन निवडणूक : सभेचे कलम, इतिवृत्त मागवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:06 AM2019-02-18T04:06:28+5:302019-02-18T04:06:46+5:30
परिवहन निवडणूक : मनसेची हरकत कायम, नगरविकास विभागाकडे तक्रार
कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्ष मनसेची हरकत कायम आहे. निवडणूक कामकाज बेकायदा झाल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार केली जाणार असून निवडणूक कोणत्या कायदेशीर कलमांनुसार घेतली तसेच निवडणुकीच्या सभेचे इतिवृत्त उपलब्ध व्हावे, असे पत्र मनसेतर्फे महापालिका सचिव संजय जाधव यांना देण्यात आले आहे.
परिवहनच्या सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे सुनील खारूक, बंडू पाटील, अनिल पिंगळे, भाजपाचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर तसेच मनसेचे मिलिंद म्हात्रे हे उमेदवार उभे होते. निवडणुकीत शिवसेनेची आणि एमआयएमची भाजपाला, तर मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ लाभली. यात शिवसेनेचे सुनील खारूक यांना ११२, बंडू पाटील १०६, अनिल पिंगळे १०६, तर भाजपाचे संजय मोरे यांना १०८, स्वप्नील काठे १०५ मते मिळाली. पण, भाजपाचे तिसरे उमेदवार दिनेश गोर आणि मनसेचे मिलिंद म्हात्रे यांना ९६ अशी समसमान मते मिळाल्याने सहावा विजयी उमेदवार कोण, हा पेच कायम राहिला होता. पण, सचिव संजय जाधव यांनी महापौरांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे आणि जर अधिकार वापरायचा नसेल, तर चिठ्ठ्या टाकून निर्णय घेता येईल, असा नियम सभागृहात वाचून दाखवला. मात्र, चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्या, असा आग्रह मनसेकडून धरण्यात आला. तर, शिवसेना-भाजपाकडून महापौरांनी निर्णायक मत द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मनसेच्या आक्षेपानंतर त्यांनी केलेल्या मागणीनुसार सातही सदस्यांना पडलेल्या मतांची फेरमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीनंतरही उमेदवारांना पडलेल्या मतांची संख्या ‘जैसे थे’ राहिली. प्रत्येक सदस्याला सहा मते देण्याचा अधिकार आहे, मग महापौरांनी निर्णायक मत दिल्यास त्यांच्या मतांची संख्या सात होते. हे बेकायदेशीर नाही का, असाही सवाल मनसेने केला. यावर सचिव जाधव यांनी मनसेचा आक्षेप चुकीचा असल्याकडे लक्ष वेधत मत देण्याची प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण सभागृहात दिले होते. जाधव यांच्या खुलाशानंतर मनसेचे आक्षेप फेटाळत महापौर विनीता राणे यांनी स्वत:ला असलेल्या अधिकारात भाजपाचे गोर यांचे सहावे उमेदवार म्हणून नाव घोषित केले. दरम्यान, मनसेची निवडणूक प्रक्रियेबाबतची हरकत कायम असून त्यांनी आता नगरविकास विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
...तर उच्च न्यायालयात जाणार
मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी सचिव जाधव यांना दिलेल्या पत्रात परिवहन निवडणूक प्रक्रियेची माहिती मागवण्यात आली आहे. निवडणुकीत उमेदवार या नात्याने किती जणांनी सहभाग घेतला. त्याची संपूर्ण नावांची यादी उपलब्ध व्हावी. त्यापैकी प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली, याबद्दलची माहिती मिळावी. एकूण सात सदस्यांपैकी पाच सदस्य निवडून आल्यानंतर उर्वरित दोन सदस्यांमध्ये मतांची बरोबरी झाल्यावर त्यापैकी एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कोणत्या प्रकारची पद्धत पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी वापरली, त्याबद्दलची माहिती कायदेशीर कलमांसहित मिळावी. या निवडणूक प्रक्रियेचे इतिवृत्त उपलब्ध व्हावे तसेच सभा कामकाजाचे नियम इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध व्हावे. निवडणुकीचे कामकाज योग्य प्रकारे झालेले नसून यासंदर्भात नगरविकास विभागाकडे दाद मागितली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयातही न्याय मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रे लवकर उपलब्ध व्हावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.