परिवहन सभापती आजपासून डेपोवर
By admin | Published: July 1, 2017 07:36 AM2017-07-01T07:36:46+5:302017-07-01T07:36:46+5:30
केडीएमटीच्या प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा देऊन उत्पन्नात वाढ करा, त्यासाठी ठिकठिकाणच्या डेपोवर जाण्याचे आदेश महापौर
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमटीच्या प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा देऊन उत्पन्नात वाढ करा, त्यासाठी ठिकठिकाणच्या डेपोवर जाण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी परिवहन सभापती संजय पावशे यांना दिले आहेत. त्यानुसार ते शनिवारपासून डेपो, थांब्यांना भेटी देणार आहेत.
या दौऱ्यामुळे तोट्यातील अनेक मार्ग बंद करता येतील. त्यानुसार पावशे शनिवारी डोंबिवलीतील बाजीपभू चौकातील निवासी विभागाच्या बस थांब्याला भेट देणार आहेत. तेथे ते प्रवाशांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतील. त्याचबरोबर अन्य ठिकाणी, डेपोंनाही भेट देऊन माहिती गोळा करतील. सभापती व परिवहन सदस्य एकत्रितपणे अभ्यास करून तो अहवाल महापौरांना देणार आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल केडीएमटीच्या सेवेत केले जाणार आहेत. देवळेकर म्हणाले, डोंबिवली ते निवासी विभाग, वाशी मार्गावर अधिक प्रवासी आहेत. त्यामुळे या फेऱ्या वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे. फायद्यातील मार्गावर बस फेऱ्या वाढवून परिवहनचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या आंदोलनानंतर सलग दुसऱ्या दिवशीही केळÞकर रस्त्यावर रिक्षा कमी असल्याने रात्री पुन्हा काही काळ तणावाचा वातावरण होते. त्यामुळे केडीएमटीतर्फे प्रवाशांसाठी खास बस सोडण्यात आली. पण प्रवाशांचे आंदोलन लक्षात घेऊन एकाही रिक्षा संघटनेने किंवा आरटीओ, वाहतूक पोलिसांनी रिक्षा वाढाव्या, यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.