सिमेंट मिक्सरमधून अवैध्य मद्याची वाहतूक; ६६ लाख २९ हजारांचे ५९५ खोके जप्त
By अजित मांडके | Updated: February 25, 2025 15:55 IST2025-02-25T15:54:48+5:302025-02-25T15:55:10+5:30
या प्रकरणी वाहन चालक मोहन जोशी याला अटक

सिमेंट मिक्सरमधून अवैध्य मद्याची वाहतूक; ६६ लाख २९ हजारांचे ५९५ खोके जप्त
ठाणे : सिमेंट मिक्सरमधून गोवा राज्यात निर्मित अवैध मद्याची वाहतुक करणाºयाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अटक केली आहे. पथकाने सिमेंट मिक्सरमधून अवैध मद्याच्या बाटल्यांनी भरलेले ५९५ खोके जप्त केले आहेत. या प्रकरणी वाहन चालक मोहन जोशी याला अटक करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईत वाहनासह हा एकूण ६६ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोवा राज्यात निर्मित मद्याला बंदी आहे. असे असतानाही हा मद्याचा साठा छुप्या पद्धतीने राज्यात आणला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकांनी सीबीडी -डी.वाय. पाटील स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील घाट रस्त्यात मंगळवारी मध्यरात्री गस्त घातली. पथकांची गस्ती सुरू असतानाच १० चाकी सिमेंट मिक्सर हे वाहन संशयास्पदरित्या येत असल्याचे पथकाला आढळून आले. त्यानंतर पथकाने ते वाहन अडविले. त्या वाहनाची पथकाने तपासणी सुरू केली. त्यावेळी वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या मिक्सरचे झाकण उघडले असता, त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित अवैध मद्याचा साठा आढळून आला. पथकाने वाहन ताब्यात घेतले. या वाहनातून अवैध मद्याच्या बाटल्या भरलेले एकूण ५९५ खोके आढळून आले. दारुबंदी गुन्ह्यांतर्गत पथकाने वाहन जप्त केले. वाहनासह हा एकूण ६६ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक महेश धनशेट्टी करत आहेत.