उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागातच तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:31 AM2017-11-22T03:31:52+5:302017-11-22T03:32:03+5:30
स्वत:च्या प्रभागातील पुसाळकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कचराकुंड्यांकडे विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे
प्रशांत माने
डोंबिवली : केडीएमसीत विरोधी पक्षनेते म्हणून शहर अस्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी आणि प्रशासनावर तोंडसुख घेतले जात असताना, मात्र स्वत:च्या प्रभागातील पुसाळकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कचराकुंड्यांकडे विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. टंडन रोडवरील एका वसाहतीसाठी कचराकुंड्या ठेवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जॉगिंग तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाºया नागरिकांना यामुळे नाक मुठीत धरूनच वावरावे लागत आहे.
पूर्वेकडील रामनगर प्रभागातील टंडन रोडवर केडीएमसीचे विजय वामन पुसाळकर उद्यान आहे. हे उद्यान चांगल्या स्थितीत असले तरी याला लागूनच शौचालय आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच तीन कचराकुंड्या आहेत. या कुंड्यांमुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप लावण्यात आले आहे. तर, उद्यानात जाण्यासाठी पाठीमागील भागात असलेल्या प्रवेशद्वारातून नागरिकांना वाट ठेवण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे येथील स्थानिक नगरसेवक आहेत. हळबे हे शहर स्वच्छतेबाबत इतरत्र उडालेल्या बोजवाºयाप्रकरणी महापालिकेच्या महासभांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवत असतात. परंतु, त्यांच्याच प्रभागात उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचा घातलेला घाट आणि त्याकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष आश्चर्यकारक बाब ठरली आहे. तसेच उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच शौचालय असल्याने प्रवेशद्वाराची जागाच चुकीची असल्याचेही बोलले जात आहे.
निष्क्रिय कारभार कारणीभूत
पुसाळकर उद्यानासमोरील कचराकुंड्या १५ वर्षांपासून तेथेच आहेत. मध्यंतरी काँक्रिटीकरणाचे काम करताना तेथून त्या काही कालावधीकरिता अन्यत्र हलवण्यात आल्या. प्रभाग कचराकुंडीमुक्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, स्थानिक प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्या निष्क्रियतेमुळे कारभार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्या शून्य निर्णय क्षमतेमुळे योग्य प्रतिसाद मिळत नाही. या कुंड्या समोरील वसाहतीसाठी आहेत. ती वसाहत बीएसयूपीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर कायमस्वरूपी कुंड्या बंद करण्यात येतील.सध्या नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून बाजूला असणारे प्रवेशद्वार चालू ठेवण्यात आले आहे.
- मंदार हळबे, स्थानिक नगरसेवक
व विरोधी पक्षनेते, केडीएमसी
आमचे प्रयत्न सुरू आहेत
कचराकुंडीमुक्त शहरासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू आहे. परंतु, एखाद्या प्रभागातील कुंड्या हटवताना तेथे पर्यायी यंत्रणा राबवणे महत्त्वाचे असते. जेव्हा यंत्रणा सक्षम होत जाईल, तेव्हा टप्प्याटप्पयाने कुंड्या हटवल्या जातील.
- धनाजी तोरस्कर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग