ठाणकरपाड्यात कचऱ्याची समस्या

By admin | Published: July 13, 2015 03:16 AM2015-07-13T03:16:00+5:302015-07-13T03:16:00+5:30

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले

Trash problem in Thankaparpad | ठाणकरपाड्यात कचऱ्याची समस्या

ठाणकरपाड्यात कचऱ्याची समस्या

Next

अरविंद म्हात्रे , चिकणघर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७, ठाणकरपाडा या प्रभागामध्ये पायवाटांचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी कचऱ्याची समस्या, गटारांच्या दैनंदिन साफसफाईची समस्या मात्र आहेच. या प्रभागातील बराचसा भाग बैठ्या चाळींचा आहे. दोन चाळींच्या पाठीमागच्या गल्ल्यांकडे दुर्लक्ष आहे. गजानन महाराज मंदिर रोडवरील अष्टविनायक चाळीमध्ये पायवाटा नाहीत. कधी तरी बसविलेल्या जुन्या लाद्या निखळलेल्या आहेत. येथे पेव्हरब्लॉक अथवा नव्या टाइल्स का बसविल्या नाहीत, असा सवाल चाळीत राहणारे नागरिक विचारत आहेत.
स्वच्छतेच्या बाबतीत जेथे काळजी घ्यायला पाहिजे, तेथे ती घेतली जात नाही. जैन शाळेच्या बाजूलाच कचराकुंडी आहे. या दुर्गंधीचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. आग्रा रोडवरून ठाणकरपाड्यात जाताना रस्त्यावरच ही कचराकुंडी आहे. सकाळी कचरा उचलला तरी दिवसभरात ती पुन्हा भरते. अशीच अवस्था गजानन महाराज मंदिराजवळ आहे. या दोन्ही कचराकुंड्या येथून हटविण्यास नगरसेवकाला काय अडचण आहे, असा सवाल नागरिक करीत आहे. सरहद्दीचा वाद येथेही आहे. ठाणकरपाडा आणि काळातलाव यांच्या हद्दीवरील ठाणकरपाडा- गावठाणचा रस्ता, गटारे अद्याप प्रलंबित आहेत. याच रस्त्यावर मनपाचे हॉस्पिटल आहे. मात्र, विकासकाच्या अनियमित बांधकामामुळे हे सेवेसाठी तयार असलेले हॉस्पिटल अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागातील नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्यच नाही. मनपा अधिकाऱ्यांचेही काही जात नसल्याने ते गंभीर नाहीत. मला काय त्याचे, ही धारणा दोघांचीही असल्याने हे हॉस्पिटल सुरू होऊ शकलेले नाही. या प्रभागामध्ये दुर्गानगर, गजानन महाराजनगर, मोहिंदरसिंग काबुलसिंग रोडकडून रमाबाई आंबेडकरनगर, परवाणीचापाडा, साईबाबानगर आदी परिसरांचा समावेश आहे.
मोहिंदरसिंग काबुलसिंग रस्त्यावरून हायवेकडे जाताना गजानन महाराज मंदिराकडे वळणाऱ्या रस्त्यावरच सम्राट अशोक चौक आहे. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार निधी खर्च झाला आहे. परंतु, चौकाच्या सुशोभीकरणाची कोणतीच निशाणी नजरेस पडत नाही. फक्त सम्राट अशोक चौक असा बोर्ड आहे. विधान परिषद आ. संजय दत्त यांनी हा निधी दिलेला आहे. मात्र, ज्या कामासाठी निधी मिळाला, त्यासाठी तो वापरला गेला नसल्याने चौक भकासच आहे. नगरसेवकाने मात्र प्रभाग समस्यामुक्त झाल्याचा दावा केला आहे.

Web Title: Trash problem in Thankaparpad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.