शुक्रवारपासून महालक्ष्मीमातेची यात्रा
By admin | Published: April 20, 2016 01:52 AM2016-04-20T01:52:00+5:302016-04-20T01:52:00+5:30
महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सावाला २२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून ती ६ मे पर्यंत राहणार आहे
शौकत शेख, डहाणू
महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सावाला २२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून ती ६ मे पर्यंत राहणार आहे. या यात्रेत लाखो भक्तांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महालक्ष्मी देवस्थान तसेच पोलीस व महसूल यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, राजस्थान, वापी, बलसाड, सुरत, अहमदाबाद, तसेच पालघर, ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविक येथे दर्शनाला येत असतात. यात्रा सुरू झाल्यानंतर दररोज येथे एक ते दिड लाख भाविक आपल्या कुटूंबासह हजेरी लावत असल्याने प्रशासनाने आणि महालक्ष्मी ट्रस्टचे नियोजन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस तसेच देवस्थान ट्रस्ट एक महिन्यापूर्वीच बैठक घेऊन शासनाच्या प्रत्येक विभागाला जबाबदारी सोपवून यात्रा सुरळीत कशी पार पाडता येईल याच्यावर विचार विनिमय करून उपाय योजना केल्या आहेत.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता, जागृक आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच हे ऐतिहासिक देवस्थान असल्याने मुंबई तसेच गुजरातकडे जाणारे नागरीक महालक्ष्मी मातेच्या दर्शना शिवाय पुढे जात नाही. गझनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आले. पुढे मांगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायीका आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला घनदाट जंगल असलेला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असेही सांगितले जाते. विशेष म्हणजे महामक्ष्मी मातेचे मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून अठरा किलोमिटर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक येथून चार कि. मी. असलेल्या वधना गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फुट उंचावर असून तेथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. तर गडाच्या पायथ्याशी देवीचे भव्य आणि आकर्षक असे मंदिर आहे.